फेरीवाला मार्केटसाठी आठ जागा निश्चित, शनिवार-रविवार शेतकऱ्यांचा आठवडी बाजार
पुणे शहरात फेरीवाला मार्केट उभारण्यात येणार असून यासाठी महापालिकेकडून पहिल्या टप्यात आठ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या निश्चित जागीच हे मार्केट उभे केले जाणार आहे. यामध्ये बावधन, बाणेर, कोंढवा आदींचा समावेश करण्यात आला आहे. शनिवार, रविवार या जागी शेतकऱ्यांचा आठवडी बाजार असेल. उर्वरित सहा दिवस फेरीवाला या जागा वापरतील.
या मार्केटच्या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सूचना केली होती. त्यानुसार या मार्केटचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मंत्री सावंत यांनी याबाबतच्या कामकाजाचा नुकताच आढावा घेतला. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पथारी तसेच फेरीवाला मार्केटसाठी जागा निश्चित करण्यात यावी. मार्केटच्या ठिकाणी महापालिकेने सर्व सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, परंतु दैनंदिन देखभालीचे काम निविदा काढून द्यावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महापालिकेला केली आहे. तसेच मेट्रो पार्किंगच्या जागा, शंकर महाराज मठाजवळील अतिक्रमण या विषयावर सावंत यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली.
पहिल्या टप्प्यात आठ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा जागांचे काम पूर्ण झाले आहे. आणखी काही जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. आरोग्य मंत्र्यांनी त्यांची माहिती घेतली. निश्चित केलेल्या जागी महापालिकेने हे मार्केट उभारावे. मात्र त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम निविदा काढून देण्यात यावे, अशी सूचना केली. दर शनिवार व रविवार हे मार्केट शेतकऱ्यांना आठवडी बाजारासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित सहा दिवस ते फेरीवाला यांना व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाणेर, बावधन, कोंढवा अशा सहा ठिकाणांवर लवकरच हे मार्केट सुरू करण्यात येणार असल्याचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
तसेच सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठाजवळील अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी केल्या. या अतिक्रमणांमुळे येणाऱ्या भक्तांना त्रास होत असल्याने त्यावर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच मेट्रो मार्गावरील स्थानकालगत पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही. ही व्यवस्था करण्यासाठी मेट्रोला पार्किंगसाठी जागा हव्यात आहेत. या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.