संग्रहित छायाचित्र
अमोल अवचिते
केंद्र सरकारकडून क्षयरोग रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत उपचार देण्यात येतात. त्यासाठी औषधांचा पुरवठादेखील केला जातो. मात्र औषधांच्या पुरवठ्यालाचा 'क्षय' रोग झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर क्षय रोग रुग्णांना (एमडीआर, मल्टी ड्रग रेझिस्टंट ) उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांचे उपचार आता रामभरोसेच असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. औषधांअभावी ठाणे जिल्ह्यात १८ तर नांदेड जिल्ह्यात २४ तासात २४ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. वेळीच औषधांचा पुरवठा झाला नाही तर पुण्यासह राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सरकारकडून रुग्णांसाठी औषधे वेळेत पुरवण्यात येतात. मात्र पुणे जिल्ह्याला गेल्या दोन ते महिन्यांपासून औषधांचा पुरवठा होत नसल्याचे आरोग्य अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे रुग्णांना औषधांचा पुरवठा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. औषधांचा पुरवठा वेळेत करण्यास अपयश आल्याने केंद्राने आणि राज्याने आरोग्य व्यवस्थेला तुम्हीच स्थानिक पातळीवर आता औषधे खरेदी करा असे पत्र दिले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची धांदल उडाली आहे. खुल्या मार्केटमध्ये अपेक्षित असलेली औषधे उपलब्ध नाहीत. तसेच नव्याने औषधे येण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना औषधे मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. तसेच त्यामुळे क्षयरोग निर्मूलनाच्या घोषणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीतील ७३ रुग्णालयांमध्ये एकूण ५ हजार क्षयरोग रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पैकी १५० रुग्ण गंभीर आहेत, तर पुण्याच्या ग्रामीण भागात ९४ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांवर १८ ते २० महिने उपचार केले जातात. गंभीर रुग्णांना ६ प्रकारच्या औषधांच्या गोळ्या दिल्या जातात. त्यातील चार गोळ्यांचा पुरेसा साठा आहे, तर साक्लोसरिन आणि क्लोफा झेमिन या गोळ्यांचा साठा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे जोपर्यंत औषधे मिळणार नाहीत, तोवर या रुग्णांना आहे त्या गोळ्या पुरवण्यासाठी आरोग्य विभागाला मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे.
महापालिकेला क्षयरुग्णांसाठी दरमहा सुमारे आठ हजार गोळ्यांची आवश्यकता आहे. परंतु सद्यस्थितीत पुढील पंधरा दिवस पुरले इतकाच साठा प्रशासनाकडे शिल्लक आहे. स्थानिक पातळीवर औषध खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, औषधे मिळत नाहीत. औषधे खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इतर राज्यातून औषधे उपलब्ध झाली तर तिथून ती खरेदी केली जातील, असे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये देखील अशीच स्थिती आहे. तुटवडा असलेल्या औषधांची खरेदी स्थानिक पातळीवर करा, अशा सूचना तीन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील रुग्णालयांना देण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागात एमडीआर क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पूर्वी रुग्णांना एक महिन्याचे औषध देण्यात येत होते. सध्या दहा दिवसांचे औषध देण्यात येत आहे.
साक्लोसरिन आणि क्लोफा झेमिन या गोळ्यांचा तुटवडा अल्प प्रमाणात जाणवत आहे. या गोळ्या येत्या आठ ते दहा दिवसात मिळतील. सध्या सर्व प्रकारच्या औषधांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे. तातडीने गरज असलेल्या औषधांची स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येत आहे. क्लोफा झेमिन या ६ हजार गोळ्या उपलब्ध आहेत, तर साक्लोसरिन या एक हजार गोळ्या उपलब्ध आहेत. पुढच्या दोन आठवड्यात पाच हजार गोळ्या उपलब्ध होतील.
- डॉ. संजय दराडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी
एक महिन्यापूर्वी राज्य सरकारचे पत्र आले आहे. त्यानुसार खुल्या बाजारातून औषध खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, औषधे मिळत नसल्याची स्थिती आहे. ५ ते ६ हजार गोळ्यांचा साठा आहे. नवीन गोळ्यांचा पुरवठा येत्या १५ दिवसात होणार आहे. साक्लोसरिन या गोळ्या मिळण्यास अडचणी येत आहेत. मात्र या गोळीचाही साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. औषधांचा साठा कमी पडू देणार नाही.
- डॉ. प्रशांत बोठे, क्षयरोग अधिकारी, पुणे महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.