'बॉडीबिल्डिंग'च्या नावाखाली नको तो 'डोस'
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
व्यायाम करून पिळदार शरीर कमाविण्यासह 'सेक्स पॉवर' वाढविण्यासाठी ‘मेफेन्टर्माइन सल्फेट इंजेक्शन’चा महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून होणारा वाढता वापर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला आहे. या इंजेक्शनचा साठा आणि पुरवठा करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
रवी थापा असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, मेफेन्टर्माइन सल्फेट इंजेक्शनच्या ९५ बॉटल्स आणि ६०० ग्रॅम गांजा त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार आणि पथकाला पिंपरी-चिंचवडमधील काही नामांकित महाविद्यालयाच्या परिसरात गांजासोबतच अन्य अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे.
या माहितीच्या आधारे पिंपरीतील एका नामांकित कॉलेजच्या परिसरात गांजाच्या पुड्या विकताना रवी थापाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून सहाशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. मात्र, गांजा व्यतिरिक्त अन्य अमली पदार्थांची सध्या कॉलेज तरुण-तरुणींना विक्री होत असल्याचे समजल्याने खंडणी विरोधी पथकाने थापा याला बोलते केल्यावर त्याच्याकडून मेफेन्टर्माइन सल्फेट इंजेक्शनच्या ९५ बॉटल्स आढळून आल्या आहेत.
पोलिसांनी जप्त केलेल्या या ९५ बॉटल्समध्ये प्रत्येकी तीन इंजेक्शन डोस असल्याचेही तपासात समोर आले असून, याच्या अतिरिक्त वापराने जीव जाण्याचाही धोका असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. गांजा, बटन, मॅवमॅवसह अन्य अमली पदार्थांव्यतिरिक्त अन्य काही पदार्थांची विक्री वाढल्याचे समजल्याने थापाने मेफेन्टर्माइन सल्फेट इंजेक्शन कोठून आणले हेही तपासले जात आहे.
या इंजेक्शनचा वापर प्रामुख्याने पिळदार शरीरयष्टी कमाविण्यासाठी आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठी सर्रास होत असल्याचे उघड झाले आहे. इंजेक्शनच्या वापराने शुद्ध हरपण्यासह अन्य काही बदल शरीरात होत असल्याने सध्या तरुणांकडून या इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, याचा साठा आणि पुरवठा करण्यासाठी अधिकृत केमिस्टनादेखील अनेक नियम सरकारने घालून दिले आहेत. परंतु, त्यानंतरही थापा सर्रासपणे विक्री करत असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
थापाला पकडल्यानंतर आता शहरातील जिमचालक-मालकदेखील पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षणासाठी विविध राज्यांतून आणि परदेशातून विद्यार्थी येत असतात. त्यामुळे या इंजेक्शनचा पुरवठा करण्यामागे आंतरराज्य टोळी असल्याची शक्यतादेखील पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी रवी थापाला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता थापाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.