संग्रहित छायाचित्र
पुणे : महापालिकेच्या शहारासह उपनगर (PMC News) भागातील मोकळ्या जागांवर फटाका स्टॉल (Firecracker) उभारण्याची परवानगी दिली जाते. लिलाव पध्दतीनुसार स्टॉलसाठी सोडत केली जाते. (Pune News) यंदा महापालिकेने प्रथमच स्टॉलसाठी ऑनलाईन सोडत (Diwali) काढण्याचा निर्णय घेतला होता. हा घेतलेला निर्णय पालिकेला चांगलाच फायदेशीर ठरला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जादा भाडे जमा मिळणार असल्याचे व्यवसायिकांनी दिलेल्या प्रसिदावरुन समोर आले आहे.
महापालिकडून स्टॉलसाठी लिलाव करण्यात येत होता. ऑफलाईनपध्दतीने हा लिलाव होत असल्याने ठराविक व्यवसायिकांची मक्तेदारी तयार झाली होती. तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या दादागिरीपुढे अनेकांना लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडावे लागत होते. त्यामुळे पालिकेने यंदा पुढाऱ्यांच्या दादागिराला लगाम लावत थेट फटाका स्टॉलसाठी यंदा ऑनलाइन लिलाव पद्धत लागू करण्याचा निर्णय जाहिर केला होता. यामुळे इच्छुकांना समान संधी मिळणार असल्याचे बोलले गेले. त्यानुसार महापालिका भवन येथील मुख्य कार्यालयासोबतच १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीला मिळालेल्या प्रतिसादावरून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाडे स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.
मागच्या वर्षी सर्वांत कमी भाडे हे चोवीस हजार १०० रुपये इतके मिळाले होते. तर यंदा एक लाख ७५ हजार रुपये इतके सर्वांत कमी भाडे मिळाले आहे. ज्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये भाडे मिळत होते, तेथे यंदा दोन लाख रुपयांपर्यंत बोली लावली गेल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. एकाही ठिकाणी एक लाख ७५ हजार रुपयांच्या खाली भाडे नमूद केले गेले नाही. तर गेल्यावर्षी पाच ठिकाणी एक लाख रुपये हे सर्वाधिक भाडे महापालिकेला मिळाले होते. गेल्यावर्षी सोळा ठिकाणी ३० हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे मिळू शकले नव्हते. यंदा मात्र, ऑनलाईन सोडतीमुळे भाड्यात आठ पट भाडे वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. यामुळे पालिकेला चांगलेच उत्पन प्राप्त होणार असल्याने महापालिकेची दिवाळीच झाली, अशी चर्चा रंगली आहे.
क्षेत्रिय कार्यालयानुसार फटाका स्टॉलसाठी शहरातील १२ ठिकाणी १६३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेतर्फे वर्तक बागेच्या शेजारी नदीकाठच्या रस्त्यावर स्टॉलसाठी भाड्याने जागा दिली जाते. गेल्या वर्षी तेथे ३५ स्टॉलसाठी लिलाव घेण्यात आला होता. त्या वेळी ६६ जणांनी अर्ज केले होते. लिलाव सुरु झाल्यानंतर काही स्थानिक पुढाऱ्यांनी दादागिरी करीत अनेकांना बोली लावण्यापासून रोखले होते. त्यावरून गोंधळ झाला होता. त्याचवेळी काही जणांनी ऑनलाइन बोलीच्या पद्धतीची मागणी केली होती. वर्तक बागेसह कोंढवा, हडपसर, धानोरी, कोथरूड, पर्वती, कात्रज, धायरी, कल्याणीनगर, खराडी, बालेवाडी, हडपसर येथे फटाका स्टॉल असणार आहेत.
ऑनलाईन लिलाव म्हणजे सट्टा असल्याचा केला होता आरोप...
महापालिकने फटाका स्टॉलसाठी ऑनलाईन लिलाव पध्दत यंदा लागू केले आहे. या पध्दतीला फटाका व्यवसायिकांनी विरोध केला असून संताप व्यक्त करत ही पध्दत म्हणजेच एक प्रकारचा सट्टा असल्याचा आरोप केला होता. ऑनलाईन पध्दतीमुळे फटाका व्यवसायिकांवर अन्याय होणार असल्याची भावना व्यक्त करुन यंदा ही पध्दत रद्द करुन ऑफलाईन पद्धतीने लिलाव काढावा. तसेच पुढच्या वर्षी ऑनलाईन पद्धती लागू करावी, अशी मागणी केली होती. त्यावर ऑनलाईन लिलावामध्ये जर काही त्रृटी असतील तर त्या दूर केल्या जातील. परंतु काही झाले तरी ऑनलाईनच लिलाव होणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्पष्ट केले होते.