संग्रहित छायाचित्र
सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी मधील ‘ओपनस्पेस’ ची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार लक्ष्मीबाई चास्टवे चॅरिटेबल ट्रस्टने ताब्यात घेतली आहे. दरम्यान, महापालिकेने या जागेचा ताबा दिला नाही असा दावा केला आहे. ही जागा परत मिळविण्यासाठी आता महापालिकेच्या विधी विभागाला धावपळ करावी लागणार आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या विजयानगर कॉलनी येथील सुमारे ६ हजार ५४. ३१ चौरसमीटर एवढी जागा ओपन स्पेस म्हणून दर्शविली गेली आहे.
सन १९८८ साली महापालिकेने या जागेचा गैरवापर होत आहे, या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीप्रमाणे जागा मालकास नोटीस पाठविली होती. तसेच केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात ही जागा महापालिकेने ताब्यात घेतली. त्याविरुद्ध ट्रस्टने कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती. या दाव्याचा १९९९ साली निकाल लागला. सदर निकालानुसार जागेचा ताबा घेण्यापासून महापालिकेला मनाई केली होती. सदर जागा ताबा घेताना आवश्यक प्रक्रिया पार पाडली गेली नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.
या नंतर महापालिकेने २००० साली पुन्हा जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु केली. दरम्यान, ट्रस्टने २०२० साली न्यायालयात दरखास्त दाखल करून २००७ च्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात महापालिकेला नोटीस मिळाली नाही असा दावा विधी विभागाकडून केला जात आहे. या दरखास्तीनुसार १९ नोव्हेंबर रोजी सदर जागेचा ताबा हा न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रस्टला दिला गेला.
दर ताब्याच्या कागदपत्रावर महापालिकेच्यावतीने कोणी सह्या केल्या नाहीत. तसेच न्यायालयाकडे महापालिकेच्या विधी विभागाने अर्ज दाखल केले आहे. यामध्ये दरखास्तीवर अंमलबजावणी करण्यापुर्वी न्यायालय कोणत्या गोष्टींचा विचार करू शकते याची माहीती दिली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने ताबा देण्यास विरोध केला आहे, या हरकतीचा विचार करावा असे अर्जात नमूद केले आहे. या निर्णयाविरुद्ध अपिल करण्यासंदर्भात विधी विभागाकडून विचार केला जात आहे.
– निशा चव्हाण, महापालिकेच्या विधी सल्लागार
सदर जागेचा ताबा १९६७ पासून आमच्याकडे आहे. महापालिकेने जाहीर प्रकटन देऊन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया बेकायदेशीर जागेचा कोणताही गैरवापर होत नाही, त्यासंदर्भात कोणताही पुरावा सादर नाही.
- लक्ष्मीबाई चास्टे ट्रस्ट
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.