दंड वसूलीत उदासीनता दाखविल्यामुळे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
पुणे: परवानगी न घेता पालिकेच्या रस्त्यावर खोदकाम केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या कोट्यवधीचा दंड वसूलीसाठी महापालिका PMC) अधिकारी उदासीन असल्याचे दिसून आले आहे. दंड वसूलीबाबत कोणतीही कार्यवाही केले नसल्याने अशा उदासीन अधिकाऱ्यांवर ७२ क या कमलानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आली आहे. याबाबतची सुनवाणी २८ नोव्हेबंरला होणार आहे. (PMC News)
वडगावशेरी मतदार संघातील विमाननगर भागातील साकोरे नगर, सोमनाथ नगर, दत्त मंदीर चौक ते खालसा डेअरी, दिशा स्कायलाईन, नागपाल रस्ता, खराडीतील दुर्गा माता मंदिर, फिनिक्स मॉल ते श्री कृष्ण हॉटेल, विमाननगर मधील म्हाडाचा रस्ता, गणपती चौक ते न्याती इम्प्रेस पर्यंतच रस्ता आदी रस्ते परवानगी न घेता खोदल्यात आले होते. त्यामुळे पालिकेकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई आली. रस्त्याचे नुकसान झाल्याने ते नुकसान आता दंडाच्या रकमेतून वसूल होईल अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेकडून केवळ दंड आकारण्याशिवाय पुढे कोणतीही कारवाई होत नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. वडगावशेरी मतदार संघातील सामाजिक कार्यकर्ते अशिष माने यांनी रस्ता खोदल्याप्रकरणी कारवाई करुन किती दंड वसूली केली याची माहिती माहिती अधिकारात विचारली होती. त्यावर महापालिकेने अद्याप एक ही रुपया वसूली केली नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता ठेकेदारांवर किंवा बांधकाम व्यवसायिकांवर कृपादृष्टी का दाखवण्यात येत आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कशी करावी, याचीच माहिती संबंधित अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे केवळ दंडाची पावती देऊन पुढे काहीच कारवाई केली गेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे माने यांनी सीवीक मिररला सांगितले.
महापालिकेच्या जागेवर अथवा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येते. मिळकत कर न भरल्यास संपत्ती जप्त करण्यापर्यंत कारवाई केली जाते. पालिका प्रशासनाकडून मिळकत कर तसेच इतर येणी वसूली करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कडक कारवाई देखील केली जात आहे. मात्र दुसरीकडे ठेकेदारांना तसेच बांधकाम व्यवसायिकांना अभय दिले जाते. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
ड्रेनेज लाइनचे, पिण्याच्या पाण्याचे पाइप लाइन टाकण्याचे काम, अनधिकृत केबल टाकणे, अनाधिकृतरित्या नळ जोडणी आदी कारणांसाठी रस्ता खोदला जातो. रस्त्याची पाहणीकरण्यासाठी तसेच तत्काळ कारवाई करण्यासाठी महापालिकेची कोणतही यंत्रणा नाही. तसेच कायद्याचा धाक किंवा भीती राहिली नसल्याने अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून भरदिवसा रस्ता खोदला जातो. त्यावर नागरिकांनी तक्रार केली तर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. तसेच कारवाई केली असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र दंड वसूली केली जात नाही. महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालिकेने कठोर कारवाई करुन दंड वसूली करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ठेकेदार असेल किंवा संबंधित व्यक्तीकडून कायद्यानुसार दंड वसूल करता येतो. दंड देण्यास टाळाटाळ केली तर त्याच्या मालमत्ताकरात त्या रकमेचा समावेश केला जातो. असे महापालिकेच्या पथ विभागाकडून सांगण्यात येते.
शहरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. बेकायदा रस्ते खोदले जात आहेत. मात्र त्याकडे पालिका डोळेझाक करत आहे. पालिकेकडून माहिती अधिकारातून माहिती घेतली होती. त्यातून पालिकेची ठेकेदारांवर असलेली कृपादृष्टी समोर आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
- अशिष माने, सामाजिक कार्यकर्ते, वडगावशेरी, मतदारसंघ.
बेकायदा खोदलेले रस्ते : आकारण्यात आलेला दंड
- विमान नगर भागातील साकोरे नगर रस्ता : 13 लाख १६ हजार ७६३
- सोमनाथ नगर येथील पदपथाची बेकायदा खोदाई : ७६ लाख ८० हजार ९६०
- विमान नगर ते श्री कृष्ण हॉटेल दरम्यानचा रस्ता : २८ हजार २००
- विमान नगरमधील साकोरे नगर गल्ली क्रमांक २ रस्ता : २ लाख ९२ हजार ६०८
- दत्त मंदीर चौक ते खालसा डेअरी रस्ता : २५ लाख ६० हजार ३२०
- विमाननगर- दिशा स्कायलाईन रस्ता : २ लाख ५६ हजार ०३२
- खराडीतील नागपाल रस्ता, दुर्गा माता मंदिर : १४ लाख ६३ हजार ०४०
- फिनिक्स मॉल ते श्री कृष्ण हॉटेल : ३६ लाख ५७ हजार ६००
- विमाननगर मधील म्हाडाचा रस्ता : ३६ लाख ५७ हजार ६००
- गणपती चौक ते न्याती इम्प्रेस पर्यंतचा रस्ता : ५१ लाख २० हजार ६४०