महाविकासचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात जाणार हायकोर्टात

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पुणे शहरातील पराभूत उमेदवार ईव्हीएममधील कथित गैरव्यवहाराविषयी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 28 Nov 2024
  • 05:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधीज्ञ असीम सरोदे दाखल करणार याचिका

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पुणे शहरातील पराभूत उमेदवार ईव्हीएममधील कथित गैरव्यवहाराविषयी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या कथित गडबडीबाबत पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या सर्व पराभूत उमेदवारांनी बुधवारी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी शिरूरचे माजी आमदार अशोक पवार,माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, प्रशांत जगताप, सचिन दोडके, दत्ता बहिरट, प्रवक्ते अंकुश काकडे, अभय छाजेड, संजय मोरे उपस्थित होते. यावेळी ईव्हीएम हॅकिंग कशा प्रकारे झाली, याविषयी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनमधील कथित गैरव्यवहाराविषयी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.

प्रशांत जगताप म्हणाले, निवडणूक काळातील आमचा अनुभव पाहता यावेळी जो निकाल आहे तो जनतेचा कौल नाही. हा पडद्यामागे ईव्हीएम मशीनमध्ये झालेला घोळ आहे. मतदान यंत्रे १५ ते २० टक्के आधीच सेट करण्यात आली होती. ईव्हीएम मशीनमध्ये तीन युनिट असतात. ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात येईपर्यंत एकदा इंटरनेटशी जोडून चिन्ह जोडले जाते. पूर्वी बॅलेट पेपरमध्ये सर्व पारदर्शकता होती. पण ईव्हीएम मशीन २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंतचा एका दिवसाचा प्रोग्राम आधीच सेट केला होता.

त्यामुळे आम्ही व्हीव्हीपॅटमधील मते आम्ही मोजणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष फोडण्याची जबाबदारी ज्या पडद्या मागील एका नेत्याला दिली. त्याच नेत्याच्या मदतीने आता इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड करून गैरप्रकार करण्यात आला. मतदान सुरू असताना ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड करण्यासाठी काही यंत्रणा पडद्यामागे कार्यरत होत्या.

महायुतीने जयंत पाटील व रोहित पवार यांच्यासारखे आमचे नेते पाडण्यासाठी रडीचा डाव केला. आमची विनंती ईव्हीएम मशीन अधिक चांगले करा आणि जर ते हॅक होत असेल तर पुन्हा बॅलेट पेपरकडे वळावे अशी आहे. निवडणूक आयोगाने आम्ही उपस्थित करत असलेल्या प्रश्नावर खुलासा करावा, अन्यथा देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. देशातील आघाडीच्या नेत्यांनीही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे, असे जगताप यांनी सांगितले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest