सजावटीतील चिनी माळांमुळे 'शॉर्टसर्किट
खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातच शॉर्टसर्किट झाल्याने झोपेतच तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. वैभव जगन्नाथ गरुड ( वय ३५) जळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील दत्तनगर येथे वैभव गरुड हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. गरुड यांनी त्यांच्या घरातील गणपती बाप्पासमोर आकर्षक सजावट करत लाईटच्या माळा लावल्या होत्या. मात्र, मध्यरात्री घरात शॉर्टसर्किट झाले आणि घरात आग लागली. त्यामुळे घरातील सर्व साहित्य त्यात साड्या, बेड आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. मात्र, या आगीत गादीवर झोपलेले वैभव यांचा जागेवरच जळून मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
वैभव हा परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित होता. त्याच्या पाठीमागे पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पत्नीदेखील धक्क्यात आहे. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. अनेकांना ऐकून हादरा बसला आहे. वैभव याच्या जाण्याने त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.