संग्रहित छायाचित्र
औंध जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त समाप्त करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिपरिचारीका यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. दरम्यान, आमदार भिमराव तापकीर यांनी यावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
पिंपळे गुरव येथील दिप्ती विरनळ या गर्भवती महिलेच्या अचानक पोटात दूखू लागल्याने २३ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा रुग्णालयात आणले होते. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने गर्भवती महिलेची तपासणी करतेवेळी केलेल्या दुर्लक्षामुळे प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे तिला ससून रुग्णालयात पाठविले होते. मात्र, रस्त्यातच प्रसूती झाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला. याबाबत कोणती कारवाई केली अशी विचारणा आमदार तापकीर यांनी केली.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, हे अंशत: खरे असून ही महिला २६ आठवडयाची गरोदर (कमी दिवसाची) असल्याने प्रसुती पश्चात तात्काळ बाळाला व्हेंटिलेटर आवश्यक असल्याने ससून सर्वोपचार रुग्णालय येथे १०८ सुविधेसह संदर्भित करण्यात आले होते. तथापि या महिलेला ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे न नेता पुणे महानगरपालिकेच्या औंध कुटीर व प्रसुती रुग्णालयात नेले. तेथील रुग्णवाहिकेमधून तात्काळ ससून सर्वौपचार रुग्णालय येथे पोहचल्यावर तिचा गर्भपात होवून मृत बाळ जन्मले.
चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिपरिचारीका यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असे सावंत यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.