उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन
पुणे: वाढलेली भाईगिरी वेळीच आटोक्यात आणणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे, पोलिसांना सोयी सुविधा देण्यास सरकार म्हणून आम्ही कमी पडणार नाही. मात्र पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली तर खपवून घेणार नाही, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.
उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन रविवारी (दि. २१) अजित पवार यांच्या हस्ते झाले. ‘‘पोलीस स्टेशनमध्ये काम करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणताही भेदभाव करता कामा नये. पोलिसांमध्ये सिंघम प्रवृत्ती बळावू नये, याची दक्षता घ्या. पोलीस कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षित करा, सायबर गुन्ह्यांवर अंकुश ठेवा,’’ असे यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले.
सुमारे तीन वर्षांच्या विलंबाने उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार राहुल कुल, जिल्हा बँक संचालक प्रदीप कंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त आर राजा, उपविभागीय अधिकारी दौंड स्वप्नील जाधव, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सरपंच भाऊसाहेब कांचन यांच्यासह अन्य वांजी सरपंच पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘मी आजच पोलीस भरतीच्या संदर्भातील फाईलवर अर्थ विभागातर्फे सही केली असून ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के पोलीस भरती करण्याची यामध्ये शिफारस केली आहे. मुख्यमंत्री येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्याच्यावर निर्णय घेतील आणि पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल. ससून हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत अयोग्य आहे. यामध्ये कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित न करता बडतर्फ करण्याची कठोर भूमिका घेतलेली आहे.’’
आम्ही राज्यकर्ते म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकडे तसेच त्यांना लागू लागणाऱ्या सुविधांकडे गांभीर्याने पाहात आहोत. तशा तरतुदी करून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र पोलिसांनीही आपल्या कर्तव्यात कसूर करता कामा नये, असे खडे बोल यावेळी अजित पवार यांनी सुनावले.
पोलीस डोळेझाक का करतात?
अजित पवार म्हणाले, ‘‘तुरुंगात असणाऱ्या भाईंचे वाढदिवसाचे, मयतीचे फ्लेक्स लागतात. गुंड जेलमधून सुटल्यावर मोठ्या मिरवणुका निघतात. याकडे पोलीस डोळेझाक का करतात? कायदा सुव्यवस्था राखणे आणि अपप्रवृत्ती वाढीस लागू न देणे, याची तसेच आम जनतेला गुंडांचा त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे.’’
सहकारात राजकारण न आणता सामंजस्याने काम केले तर सहकारातील संस्था चांगल्या टिकतील, वाढतील आणि सभासदांचे होणारे नुकसान थांबेल, असे अजित पवार यांनी यशवंतच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.