चिखलीत भरचौकात गोळीबार; तरुणाचा मृत्यू
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
कुविख्यात रावणसाम्राज्य टोळीतील गुंडाने वर्चस्वाच्या लढाईतून भरचौकात भाजीविक्रेत्या तरुणावर गोळीबार केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी टाळगाव, चिखली प्रवेशद्वाराजवळ घडली.
कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय २०, रा. महादेवनगर, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या तापकीर सोमवारी दुपारी चिखली येथील श्री क्षेत्र टाळगाव प्रवेशद्वाराजवळ चप्पल शिवण्यासाठी गेला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेले त्याचे मित्र सौरभ ऊर्फ सोन्या पानसरे आणि सिद्धार्थ कांबळे यांनी त्याच्यावर गोळीबार केला. सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. नागरिकांनी सोन्या तापकीर याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सोन्या तापकीरचे भाजीविक्री आणि छोटे स्क्रॅपचे दुकान होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेल्या हल्लेखोरांचीदेखील गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. सोन्या आणि मारेकरी या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने पोलिसांना तपासात अनेक अडथळे येत होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.