ग्रामपंचायत सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा
#लोणी काळभोर
ग्रामपंचायत सदस्याने (रा. कोरेगाव मूळ) गावातील एका महिलेच्या घरात घुसून शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सचिन गुलाब निकाळजे असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. निकाळजे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी करत विनयभंग केला आहे. तसेच ही माहिती कोणाला सांगितली तर पीडितेस ठार मारण्याची धमकीही सचिन गुलाब निकाळजेने दिली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन गुलाब निकाळजे हा रा. कोरेगाव मूळ येथील रहिवासी आहे. तो या गावचा माजी उपसरपंच होता. आता येथील ग्रामपंचायत सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असलेल्या निकाळजेने पीडितेचा दोन वेळा विनयभंग केला आहे. हा प्रकार १३ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास आणि १७ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
निकाळजे या महिलेला गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता; तसेच तिचा पाठलाग करत होता. महिलेने प्रतिसाद न दिल्याने निकाळजे तिच्यावर चिडला होता. घटनेच्या वेळी पीडित महिला काम करून घरी जात असताना सचिन निकाळजे याने चारचाकी गाडीतून तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून विनयभंग केला. एवढ्यावरच ना थांबता त्याने यानंतर फिर्यादीच्या घरात घुसून शरीर सुखाची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी महिलेने त्याला धक्का देत दूर लोटले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास मुलांना जिवे मारू, अशी धमकी देऊन निकाळजे पसार झाला. यानंतर पीडितेने या घटनेची माहिती आपल्या पतीला दिली. यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित असला तरी त्याचा आमच्या तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याची माहिती फौजदार किरण धायगुडे यांनी दिली.
feedback@civicmirror.in