संग्रहित छायाचित्र
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरात २,८०० नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या हालचालींवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी मंगळवारी शहरातील एका कार्यक्रमात केली.
गेल्या दशकभरात घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन चोरी, दरोडे, मारामारी आणि अपघातांची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे अशा ठिकाणी लावले जाणार आहेत. ज्या ठिकाणी सर्वाधिक गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गुन्हेगारांबरोबरच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर देखील लक्ष ठेवण्यास वाहतूक पोलीसांना मदत होणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडण्यासाठी पुणे महापालिका आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांनी यापूर्वीच १,४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सध्या शहरातील सुमारे १२४ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यातच आता २,८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आणखी १३५ चौक शहर पोलिसांच्या निगराणीखाली राहणार आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात चाप बसण्याची शक्यता आहे.