मतदान केंद्र सुसूत्रीकरण उपक्रमात सहकार्य करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून याअंतर्गत होणाऱ्या मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण उपक्रमात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्रांच्या सीमांचे पुर्नरचना तयार करुन मतदान केंद्रांच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून तो फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे व कंट्रोल टेबल अद्ययावत करणे हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपल्या मार्गदर्शक सूचना मांडाव्यात व राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करुन मतदारांना त्याचा लाभ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.