संग्रहित छायाचित्र
पुणे: बांधकामांना सुरक्षिततेसाठी (Construction Safety) हिरवी जाळी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासोबतच रस्त्याला जोडून सुरु असलेल्या बांधकामासमोर पदपथ असल्यास त्यावर पत्र्याचे शेड किंवा सुरक्षेसाठी भोगदा तयार उभारावा लागणार आहे. तसे आदेश महापालिकेच्या (PMC) बांधकाम विभागाकडून काढले जाणार आहेत. एक ते दोन दिवसातच या आदेशानुसार पालन करण्याचे परिपत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे आता बांधकाम व्यवसायिकांना असे शेड उभारण्याची सक्ती करण्यात येणार आहे. (Pune News)
बाणेर येथील गणराज चौकाजवळ शाळेतून घरी जाणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बांधकामांवरील सळई पडुन झालेल्या अपघातामध्ये बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील बांधकाम व्यवसायिकांकडून करण्यात येत असलेल्या हलगर्जीपणावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम व्यवसायिकांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, तसेच आणखी काय उपाय योजना करता येतील त्याबाबत महापालिकेच आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षेतेखाली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी पदपथावर पत्र्याचे छत असलेले शेड उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच हे शेड उभारताना त्याचा काय दर्जा कसा असावा, याचा देखील विचार करण्यात येणार आहे. असे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.
सईळी पडून अवघ्या ९ वर्षाच्या मुलाला महापालिका, बांधकाम व्यवसायिक यांच्या निष्काळजीपणामुळे जीव गमावावा लागल्याने पुणे शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. तसेच त्यामुलाच्या आई वडिलांना न्याय मिळावा अशी पुणेकरांची भावना आहे. शहरात ८ ते १० हजार बांधकामे सुरु आहेत. बांधकाम व्यवसायिकांना डिसी (डेव्हेल्पमेंट कंट्रोल रुल) नियमांचे पालने करणे बंधनकारक आहे. त्यानुसार त्यांनी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले होते. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बांधकामाचे सर्वेक्षण केले जाते का असा प्रश्न विचारला असता, ३० ते ३५ इंजिनिअर यांच्या माध्यमातून शहरातील सर्वच बांधकामांचे सर्व्हेक्षण करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र महापालिकेला बांधकाम व्यवसायिकांनी सुरुक्षिततेची काळजी घेण्यासाठी तसेच भविष्यात अशाी घटना घडू नये यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात झालेल्या चर्चेनुसार आता परिपत्रक काढले जाणार आहे.
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश तसेच मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शहरातील बांधकाम व्यवसायिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र महापालिकेने आदेश देवून या नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहारातील ५३४ बांधकाम व्यवसायिकांना नोटीस देण्यात आली आहे. काही बांधकाम व्यवसायिकांकडून नियमांचे पालन करण्यास सुरवात केली आहे. मात्र अद्यापही इतर बांधकाम व्यवसायिकांनी नोटीसला उत्तर देखील दिले नसल्याचे समोर आले आहे. प्रदूषणाच्या नियम पाळण्यासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र प्रदूषणाचेच नियम पाळण्यास बांधकाम व्यवयासिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तर नव्याने परिपत्रक काढल्यानंर त्याची कितपत अंमलबजावणी होईल. हे येत्या काळात दिसून येईलच.