संग्रहित छायाचित्र
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडीची लाट पसरली आहे. राज्यातील अनेक भाग गारठल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. १५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी ४.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर पंजाबमधील ‘अदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुणे शहरात आज (१६ डिसेंबर) यंदा हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे.
पुणे शहरातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दिवाळीनंतर थंडीचे प्रमाण वाढले आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे पुण्यातील काही ठिकाणी, जसे की राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि शिवाजीनगरमध्ये किमान तापमान एक आकडी नोंदवले गेले. पुण्यात ८ ते ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. दिवसा गारवा जाणवू लागला होता. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाने थंडीचा प्रभाव कमी केला. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. ज्यामुळे ऐन हिवाळ्यात उकाडाही सहन करावा लागला. त्यानंतर आता पुन्हा गारवा जाणवू लागला आहे.
हवामान विभागाच्या तापमान नोंदी (सोमवारी)
-एनडीए ६.१ अंश सेल्सिअस (सर्वांत कमी)
-शिवाजीनगर ७.८ अंश सेल्सिअस
-लोहगाव १२ अंश सेल्सिअस
-कोरेगाव पार्क १३.१ अंश सेल्सिअस
-चिंचवड येथे १४.५ अंश सेल्सिअस
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.