संग्रहित छायाचित्र
महापारेषण कंपनीचे रास्तापेठ जीआयएस १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र अत्यावश्यक पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. ९) रात्री १ वाजेपासून ते सोमवारी (दि. ११) रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र या कालावधीत पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
महापारेषणच्या या अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या २२ केव्हीच्या ११ आणि ११ केव्हीच्या १० अशा एकूण २१ वीजवाहिन्यांद्वारे रास्तापेठ, पर्वती व पद्मावती विभागातील भागात वीजपुरवठा केला जातो. सणासुदीचे दिवस व पावसाळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर या उपकेंद्रातील काही यंत्रणेची दुरुस्ती सुरळीत वीजपुवरठ्यासाठी अतिशय आवश्यक झाली आहे. त्यामुळे दि. ९ ते दि. ११ पर्यंत यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम होणार आहे.
या कालावधीत महावितरण व महापारेषणकडून ९७ मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून पर्यायी स्वरुपात सर्वच २१ वाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी २२० केव्हीच्या पर्वती, फुरसुंगी व खडकी तसेच १३२ केव्हीच्या फुरसुंगी व मुंढवा अतिउच्चदाब उपकेंद्रातून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा होणार आहे.
पर्यायी वीजपुरवठ्याचे तांत्रिक नियोजन पूर्ण झाले असून संबंधित वीजवाहिन्या व यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे देखील पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र या ऐनवेळी एखाद्या २२ केव्ही किंवा ११ केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित वाहिनीवरील भागात वीज खंडित होऊ शकते. त्यासंबंधीची माहिती संबंधित वीजग्राहकांना एसएमएसद्वारे ताबडतोब दिली जाणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितकरण व महापारेषणने केले आहे.