कोंढव्यातील नागरिकांनो, भाडेकरूंचा करारनामा पोलीसांना देणे बंधनकारक, अन्यथा कारवाई
पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. येथील घरमालकांनी भाडेकरूंचा करारनामा पोलीस स्टेशनमध्ये देणे बंधनकारक आहे. घरमालकांनी भाडेकरू संदर्भातील माहिती लपवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत कोंढवा पोलीसांकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन पोलीसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत १८ जुलै रोजीच परिपत्रक जारी करत पोलीसांनी आवाहन केले आहे.
कोंढवा पोलीसांनी सांगितले की, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये जारी केलेल्या आदेशान्वये पुणे शहरातील राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्याकडे राहत असलेल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती, मूळपत्ता, पूर्वी राहत असलेला पत्ता, भाडेकरू संदर्भातील संपूर्ण माहिती जवळील पोलीस स्टेशन येथे घरमालकाने देणे बंधनकारक आहे. प्रत्येक घर मालकाने भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशन येथे वेळेत सादर न केल्यास घर मालकाविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
तसेच सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांनी भाडेकरुचे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरुंना सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये. प्रवेश दिल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच यासाठी ते जबाबदार राहतील. ऑनलाईनद्वारे भाडेकरूचे व्हेरिफिकेशन केल्यास त्याची एक कॉपी पोलीस स्टेशन येथे घर मालकाने देणे हे बंधनकारक असेल. कोणी हेवी डिपॉझिट मागत असेल तर आपण पोलीस स्टेशनला कळवावे. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही आवाहन कोंढवा पोलीसांकडून करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.