साखळीचोरी विकृताच्या 'अंगाशी'
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
सायकल आणि वाहनचोरी करण्याचा उद्योग सोडून वासनांध व विकृत गुन्हेगाराने केवळ महिला व तरुणींशी अंगलगट करता यावी या उद्देशाने दागिने हिसकाविण्याचा प्रकार सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. बुद्धदेव विष्णू बिश्वास (वय २४, रा. फिरस्ता) आणि मिंटू मिहिर बिश्वास (वय २६, सध्या रा. आळंदी, दोघे मूळगाव बर्धमान, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या विकृतांची नावे आहेत.
बुद्धदेव याच्यावर यापूर्वी सायकल आणि वाहनचोरीचे काही गुन्हे दाखल असून, तो यासाठी दोन वेळा कारागृहात जाऊन आला आहे. वाहनचोरीनंतर मिंटूने पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडीनजीक असलेल्या कासारसाई आणि देहूरोड, तळेगाव दाभाडे, शिरगाव भागातील महिलांचा विनयभंग करून सोनसाखळी किंवा मंगळसूत्र हिसकावण्याच्या पाच घटना केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यासमोरील रेल्वे लाईनजवळून दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणीला बिश्वासने थांबवले होते. मदत मागण्यासाठी त्याने थांबवल्याचा समज झाल्याने संबंधित तरुणी थांबली. त्या वेळी बुद्धदेवने तिला उचलून रेल्वे रुळापलीकडे नेऊन तिचा विनयभंग केला. त्यावर तिने आरडा-ओरड केल्यावर तेथून जाणारा एक दुचाकीस्वार थांबला. त्या वेळी बुद्धदेवने तिच्या गळ्यातील दागिने ओढून पळ काढला होता. त्यानंतर हिंजवडी-कासारसाई येथील साखर कारखाना भागात उसाची शेती आहे. तेथून एक तरुणी पायी जात होती. तिला शेतात रस्त्याने फरफटत नेऊन बुद्धदेवने तिचा विनयभंग करून तिच्याही गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला होता.
या दोन घटनांप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. परंतु, आरोपींचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर कासारसाई परिसरातील एका दाताच्या क्लिनिकमध्ये घुसून बुद्धदेवने तेथील डॉक्टर तरुणीच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून तिचा विनयभंग केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्या गळ्यातील दागिने काढून घेण्यास सुरुवात केली. ते तिच्या केसांमध्ये अडकले, त्यावर क्लिनिकमधीलच कात्रीने डॉक्टर तरुणीचे केस कापून तिचे दागिने घेऊन आरोपींनी पळ काढला होता. या घटनेमुळे पोलीसदेखील हादरून गेले होते. त्यामुळे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी एकत्रितपणे या गुन्ह्यांच्या तपासाला सुरुवात केली होती.
दरम्यान, यानंतर पुन्हा अशाच पद्धतीने एका छोट्या दुकानात बसलेल्या महिलेचा विनयभंग करून तिचे दागिने हिसकावण्याचा आणि त्यानंतर काही दिवसांतच नीरा विक्री करणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडले, पण कोणताच ठावठिकाणा लागत नव्हता.
बुद्धदेव बिश्वास जी कार किंवा स्वयंचलित दुचाकी चोरत होता, त्याच्या डिक्कीत दररोज लागणारे साहित्य आणि कपडे ठेवत असल्याने त्याचा राहण्याचा नेमका पत्ता नव्हता. तसेच, त्याने मिंटूला प्रत्येक गुन्ह्यात बरोबर घेतले नसल्याने त्याचा सध्याचा आळंदी येथील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून राहण्याचा पत्ता असला, तरी तोदेखील पोलिसांना सापडलेला नव्हता.
दरम्यान, कासारसाई येथील शेतात तरुणीच्या विनयभंगप्रसंगी तिचा मोबाईलदेखील बिश्वासने नेल्याचे पोलिसांना कालांतराने त्या तरुणीने सांगितले. मात्र, तो मोबाईल कायम बंदच लागत होता. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरुवात केली, तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये बुद्धदेवने अन्य एक सिमकार्ड टाकल्याचे गुन्हे शाखा युनिट चारमधील साहायक फौजदार नारायण जाधव यांना समजले. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे, सहायक निरीक्षक सिद्धार्थ बाबर, किरनाळे, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद आणि सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. संजय तुंगार, सागर पानमंद आदींच्या मदतीने बुद्धदेव बिश्वास याचा सुरू असलेला मोबाईल नंबर आणि ठावठिकाणा शोधून काढला. परंतु, बिश्वास एक फोन झाला की, मोबाईल पुढील काही दिवस बंद करून ठेवत होता. त्यामुळे त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. तसेच पोलिसांचे बूट आणि केस कापण्याची स्टाईल माहीत असल्याने दोन वेळा आरोपी पोलीस आसपास असल्याचे पाहून पळूनदेखील गेले होते. त्यामुळे वरील पथकाने बिश्वासची वेश्यागमन करण्याची सवय हेरली व मिंटूचा ठावठिकाणा काढला. त्या आधारे बुद्धदेवला अटक केली गेली.
वासनांध बुद्धदेवला अटक केल्याचे समजल्यावर या घटनेतील पीडित तरुणींनी आणि त्याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करीत आभार मानले आहेत. या घटनांबरोबरीनेच त्याच्याकडे सापडलेल्या दागिन्यांवरून अन्य एका गुन्ह्यातील पीडित तरुणी अद्याप समोर आली नसल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा पद्धतीने कोणाचे दागिने हिसकावण्यात आले असल्यास गुन्हे शाखा युनिट चारशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.