खराडी, केशवनगर, साईनाथ नगर भागात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण
खराडी, केशवनगर, साईनाथ नगर भागात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण
पुणे: : मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे. मात्र अद्याप राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शहरासह उपनगर भागांमध्ये उपोषणे आंदोलने करण्यात येत आहे. खराडीतील चंदननगर भागात, वडगावशेरीतील साईनगर आणि केशवनगर भागात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाचा लढा राज्य भरात तीव्र करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी गावागावात मोर्चे, आंदोलने करण्यात येत आहेत. या सोबतच पुणे शहरात देखील मराठा समाजाकडून विविध माध्यमातून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला जात आहे. मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर मंगळवारी पुण्यातील नवले ब्रीज येथील राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलकांनी टायर जाळून निषेध नोंदविला. यामुळे जवळपास दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही गोष्ट सोडता शहाराच्या कानाकोपऱ्यात करण्यात येणारी आंदोलने शांततेच्या मार्गाने करण्यात येत आहेत. आंदोलनाला प्रत्येक भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणसाठी प्राणाची बाजी लावून उपोषण आंदोलन करत आहेत. राज्यातून सकल मराठा समाजाचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. राज्य सरकार मात्र गांभीर्याने लक्ष देत नाही. जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका झाल्यास समाज आक्रमक होऊन मंत्री, खासदार, आमदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
खराडीत चंदन नगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अभिवादन करुन पुतळ्याच्या बाजूलाच सकल मराठा समाजाने एकत्र येत साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोवर साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचे बाळासाहेब सुदाम पठारे यांनी सांगितले. केशवनगर भागातील मुख्य चौकात समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणसाठी प्राणाची बाजी लावू शकतात, तर आपण का नाही. असा प्रश्न उपस्थित करुन आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरुच राहणार असल्याचे संतोष माने, सुनील जामले यांनी सांगितले. वडगावशेरीतील साईनगर, रोघोबा पाटील नगर आदी परिसरातील समज एकटवला असून मुख्य चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे.