बिल्डरांना ‘महा’दणका!, पुण्यातील बिल्डरांना दंड
गृहप्रकल्पांची जाहिरातबाजी करताना क्यूआर कोड न छापणाऱ्या बिल्डर (Builders) आणि विकसकांवर महारेराने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील अनेक बिल्डरांना दंड ठोठावत दणका दिला आहे. या बिल्डरांना सक्त ताकीद देत दहा हजार ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचा दंड करण्यात आला आहे.
महारेराने १ (Maharera)ऑगस्टपासून गृहप्रकल्पांच्या सर्व प्रकारच्या जाहिराती, अगदी वेबसाइटवरदेखील क्यूआर कोड छापणे कायद्याने बंधनकारक केले आहे. जे बिल्डर गृहप्रकल्पातील सोयीसुविधांबाबत पेपर, होर्डिंग, बॅनर, प्रदर्शने आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती देतात आणि त्या जाहिरातींच्या माध्यमातून चौकशी आणि बुकिंग घेतात, त्या सर्वांना हा नियम लागू करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुण्यातील दोनशेहून अधिक बिल्डरांना याबाबत महारेराने जाब विचारला. याबाबत रितसर सुनावणी झाली. समाधानकारक बाजू न मांडणाऱ्या सुमारे ५० बिल्डरांना दंड करण्यात आला.
२३ जानेवारी २०२४ रोजी शहरातील शेकडो बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिसा मिळाल्या होत्या. या नोटिसांच्या आधारे बिल्डर आणि प्रवर्तकांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते. शहरातील सुमारे ५० नामांकित बिल्डर्सना १० हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला. या बिल्डरांनी दंडाची रक्कम १० दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे. अन्यथा दररोज त्यांना अडीचशे रुपये दंड करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना असा कोड वापरणे बंधनकारक आहे.
यासंदर्भात ‘सीविक मिरर’ला माहिती देताना असोसिएशन फॉर एडिंग जस्टिसचे रितेश मेहता म्हणाले, ‘‘महारेराने जारी केलेले कोणतेही निर्देश आणि आदेश कायद्याद्वारे लागू केले जातात. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. महारेरासारख्या यंत्रणेद्वारे दिशाभूल करणाऱ्यांवर अंकुश ठेवला जाऊ शकतो. अनेक नागरिक अशा दिशाभूल करणाऱ्यांना बळी पडले आहेत. त्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळेच महारेराने स्वत:हून दखल घेत ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला आहे.’’
‘‘क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहक प्रकल्पाचे सर्व तपशील पाहू शकतो. जमीन आदींबाबत माहिती मिळते. दर तीन महिन्यांनी प्रकल्पाचे काम कुठवर आले आहे, हे समजते. यासाठी क्यूआर कोड महत्वाचा आहे,’’ असे रेरा प्रॅक्टिशनर असोसिएशनचे ॲड. नीलेश बोराटे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
या ठिकाणी क्यूआर कोड छापणे बंधनकारक
वर्तमानपत्र, मासिके, जर्नल्सवरील जाहिराती, छापील फ्लायर्स, ब्रोशर, कॅटलॉग, पत्रके, प्रॉस्पेक्ट्स किंवा प्रकल्प साइट्सवर स्टँडी, विक्री कार्यालय, प्रकल्पांच्या वेबसाइट्स / वेब पृष्ठे, सोशल मीडिया जाहिराती, इतर कोणत्याही जाहिराती जेथे क्यूआर कोड प्रकाशित केले जाऊ शकतात.