‘बुजवलेले नाले, अनधिकृत बांधकामामुळे पुणे पाण्याखाली’
पुण्यात अनेक ठिकाणी नाले बुजवले आहेत. नाले बुजवणे हे महापाप आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला हवी. पावसाळी पाण्याची गटारे किती तरी ठिकाणी अस्तित्वात नाहीत, आहेत ती साफ नाहीत. काही ठिकाणी ड्रेनेजलाईन एकत्र झाल्या आहेत. या सर्व गैरव्यवस्थांमुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे, या शब्दात खासदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेवर आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे की, शनिवारी झालेल्या पावसामुळे पुण्याची दैना उडाली. अनेक नागरिकांचे फोन आले. वेगवेगळ्या सोसायटीमधून, वस्त्यांमधून फोन येत होते. मी पुण्यात नव्हते. पण जस-जसे फोन येत होते, तसे तसे त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी तक्रार निवारणासाठी मी बोलत होते. पावसाने नागरिकांचे खूप नुकसान झाले याचे मला खूप वाईट वाटते. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले पाण्यात अडकली. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. संसारोपयोगी वस्तूंचे जे नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई व्हावी, अशी मी आग्रही मागणी करीत आहे आहे.
कुलकर्णी यांनी म्हटले आहे की अनेक ठिकाणी घराघरांमध्ये पाणी जाऊन टीव्ही, फ्रिज आणि इतर वस्तू खराब झाल्या आहेत. अर्ध्या तासाच्या पावसामुळे पाणी मीटर रूम पर्यंत गेले. यातून काहीही अनर्थ ओढवला असता. महानगरपालिकेने आणि यंत्रणांनी याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. अनेक गैरप्रकाराकडे झालेले दुर्लक्ष, त्यांना मिळालेला आशीर्वाद यातून ही स्थिती पुणे शहरावर ओढवली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीची यंत्रणा कमी पडते आणि नागरिकांना स्वतःच एकमेकांच्या मदतीला धावावे लागते. महानगरपालिका पूर्णपणे अयशस्वी झाली, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. पालिका प्रशासनाने या सर्व व्यवस्था पुन्हा मुळापासून दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.
कुलकर्णी पुढे म्हणतात, सर्वप्रथम अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला हवी. पावसाळी पाण्याची गटारे किती तरी ठिकाणी अस्तित्वात नाहीत, आहेत ती साफ नाहीत, काही ठिकाणी ड्रेनेज लाईन एकत्र झाल्या आहेत. त्या व्यवस्थित करायला पाहिजेत. नदीपात्राची खोली वाढवायला पाहिजे. कित्येक ठिकाणी नाले बुजवले आहेत. या सर्व गैरव्यवस्थांमुळे नागरिकांचे नुकसान झाले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेकवेळा या संदर्भात मी मागण्या केलेल्या आहेत, आवाज उठवला आहे. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम केले असतील आणि अन्य काही गैरप्रकार असतील, तिथे तिथे धडक कारवाई व्हायला हवी आहे. जिथे नाल्याची रुंदी अहवालापेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी अपेक्षित रुंदी टिकण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणी जमिनीत पुरण्याची व्यवस्था कुठेही नाही. त्यामुळे या संदर्भात एक धोरणात्मक निर्णय घेऊन सोसायटीतील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते पालिकेच्या अथवा अन्य खासगी इमारतीमध्ये, जमिनीमध्ये पाणी झिरपण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचा निर्णय पालिकेला घ्यावा लागेल असे दिसते.