तृप्ती देसाई
“बारामती लोकसभा मतदारसंघात आक्रमक महिला चेहरा किंवा तळागाळात काम करणारा महिला चेहरा जो खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करेल, असा चेहरा भाजपकडे नाही. ज्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्यात त्यांच्या पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपकडून मला संधी मिळाली तर बारामतीचा गड कोसळू शकतो, मी सुप्रिया सुळेंचा पराभव करून इतिहास घडवून दाखवले, भाजपच्या वरिष्ठांकडे मी विनंती करते की मला एक संधी द्यावी”, असे विधान सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले आहे.
तृप्ती देसाई गुरूवारी बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या तक्रारी नोंदवल्या. तसेच लवकरच जनसंपर्क यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, “बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्यावर किंवा तालुक्यत गेल्यावर मला असे वाटले की लोक मला भेटतील की नाही, मला बोलतील की नाही."
"परंतू, उघडउघड लोक भेटत होती. सुप्रिया सुळेंच्या स्वभावाबद्दल बोलत होती. त्यांचे बोलणे निट नाही. त्या अनेक छोट्या छोट्या कार्यक्रमांना येत नाहीत. सुप्रिया सुळेंना काही कामच करायला लागले नाही. परंतु, सुप्रिया सुळेंच्या विरोधात चांगला कुठला चेहरा किंवा आमच्या सारखा चेहरा आम्हाला मिळालेला नाही. तुम्ही जर येथे थांबलात तर तुम्हाला आम्ही निवडणूक देऊ. त्यामुळे मला जर संधी दिली तर एक नवा इतिहास घडवून दाखवेल,” असेही तृत्पी देसाई यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “भाजप प्रवेशाबद्दल माझे कोणाशीही बोलणे झालेले नाही. वेगवेगळ्या पक्षातून मला ऑफर येत आहेत. भाजपचे पदाधिकारीही फोन करून वरिष्ठांशी बोलणार आहेत, असे मला सांगितले आहे. सध्या आम्ही भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून जनसंपर्क यात्रा काढणार आहोत, त्यानंतर कोणाकडे जायचे, कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यायची हे ठरवणार आहोत. परंतु १०० टक्के आम्ही बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.