संग्रहित छायाचित्र
पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ (डीडी) वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाटरस्ता पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून म्हणजेच २२ जुलैपासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अवजड वाहतुकीकरिता हा घाट पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढले आहेत.
वरंधा घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे. घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ऑरेंज आणि रेड इशाऱ्याच्या वेळी सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद राहील. ऑरेंज आणि रेड इशारा नसलेल्या कालावधीत सदर घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.