पुण्यासह राज्यातील १८६ कैद्यांची शिक्षा होणार माफ
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना (बंदी) विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्याती येरवडा कारागृहासह राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातील १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली असून स्वातंत्र्यदिनी त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माफी योजनेचे निकष निश्चित केले होते. राज्यातील कैद्यांची शिक्षा माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. कैद्यांना तीन टप्प्यात माफी देण्यात येत आहे. कैद्यांमधील शिस्त, त्यांचे आचारण विचारात घेऊन त्यांना भावी आयुष्यात प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षा माफ करण्यात आली आहे, असे कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.
यामध्ये पहिल्या टप्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती. दुसऱ्या टप्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती. तिसऱ्या टप्यात १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. राज्यातील येरवडा, मुंबई, नाशिक रोड, ठाणे, नागपूर, अमरावतीसह २४ कारागृहांतील कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.