बी. टी. कवडे रस्त्यावरील वाहतूकीत बदल
पुणे : पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने महापालिकेकडून (PMC) उपाय योजना केल्या जात आहेत. त्यासाठी शहरातील ज्या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या टाकण्यात आल्या नाही. तेथे अशा वाहिन्या टाकण्याचे काम केले जात आहे. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. (Traffic Update)
घोरपडी गाव ते हडपसराला जोडणाऱ्या बी. टी. कवडे रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. पावसाळी लाईनचे काम होई पर्यंत वाहतूक बदल करण्यात आला असून मंगळवार (ता. २८) पर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे.
घोरपडी गाव ते हडपसर परिसराला जोडणारा रस्ता असल्याने वाहनांची मोठी संख्या असते. या भागातील नागरिकांना हा सोयीचा रस्त्याचा आहे. बी. टी. कवडे रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली असलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साठते. तेथे पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
बी. टी. कवडे रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली कुसुमकुंज निवास ते रेंजेट हाईट बिल्डींग दरम्यान उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूकडील हडपसरकडे जाणारी वाहतूक २८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. वाहनचालकांनी उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूकडील मार्गिकेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.