संग्रहित छायाचित्र
पुणे: शहरहात विविध सण, समारंभ, वाढदिवस, लग्न सोहळे तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अनधिकृत फ्लेक्स (Unauthorized flex) लावण्यात येतात. त्यावर महापालिकेकडून (PMC Pune) कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी तक्रारी करुन देखील पालिका डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावर आता आकाश चिन्ह विभागाकडून कडक पावले उचलली जाणार असून अनधिकृत फ्लेक्स प्रकरणी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना म्हणजेच क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांवरील बेकायदा बांधकामे, हात गाड्या तसेच विविध अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र रस्त्यांवर, तसेच विद्युत खांबांवर अनधिकृत फ्लेक, खासगी क्लासेसच्या जाहिराती महापालिकेच्या नाकावर टिच्चून लावल्या जात आहेत. मात्र याकडे महापालिका डोळेझाक करुन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालिकेकडून चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहेत. त्यावर देखील राजकीय व्यक्तींकडून थेट फ्लेक्स लावले जातात. तसेच सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, चौकांमध्ये राजकीय व्यक्तींकडून वाढदिवसांच्या शुभेच्छा, विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावले जातात. याबाबत उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांवर याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही कारवाई करण्यास महापालिकेचे अधिकारी उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून शहरात कोणत्याही स्वरूपाची जाहिरात करण्यासाठी स्वतंत्र जाहिरात व फलक नियंत्रण नियम २०१३ तयार केले आहेत. यानुसार सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, चौक आदी ठिकाणी फ्लेक्स, बॅनर, फलक लावण्यास प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी देण्यात येत नाही. तरी सुध्दा शहरातील मोक्याच्या ठिकाणी, चौका-चौकांत, विविध नेत्यांचे वाढदिवस, निवड-नियुक्तीनंतर अभिनंदनाचे, नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथीनिमित्त, विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावून जाहिरातबाजी केली जाते. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, संबंधित व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ अतंर्गत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार यापूर्वी थेट नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दसरा, दिवाळी सणानिमित्ताने पुन्हा शहरभरात अनधिकृत फ्लेक लावण्यात आले आहेत. त्यावर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात मोठे होर्डिंग उभारताना अनेकवेळा नियमांचे पालन केले जात नाही, त्याकडेही महापालिकेचे लक्ष नसते. तसेच कोणत्याही परवानगी विना थेट मोठे होर्डिंग उभारलेले आहेत. ते होर्डिंग देखील महापालिकेला दिसत नाहीत तर विद्युत खांबांवरील तसेच चौकांमधील फ्लेक्स कसे दिसतील हा प्रश्न आहे. खरे तर नागरिकांनी कोणतीही तक्रार न करता पालिकेनेच अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे आपेक्षित आहे. मात्र उदासीन कारभारामुळे कारवाई होत नाही. दुसरीकडे अतिक्रमण विभाग किंवा आकाश चिन्ह विभाग असो हे दोन्ही विभागस एकाच माळेच मनी आहेत. दिवाळी सणामुळे आता अनधिकृत शुभेच्छांचा वर्षाव आता होईल. त्यामुळे पालिकेने वेळीच कारवाई करावी.
- विक्रम कदम, नागरिक
शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येते. नागरिकांना अनेक वेळा असे अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत, असे आवाहन केले आहे. मात्र त्याकडे नागरिक दुर्लक्ष करताना दिसून येतात. अनेकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येते. आता असे फ्लेक्स उभारले गेले आणि त्यावर कारवाई झाली नाही तर थेट सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरण्यात येणार आहे. कारणे दाखवा नोटीस पाठविली जाईल.
- माधव जगताप, अतिक्रमण विभाग/ आकाश चिन्ह विभाग प्रमुख