अतिक्रमणच्या अधिकाऱ्याला मारहाण करणारे अटकेत
#ढोले पाटील रस्ता
ढोले पाटील रस्ता परिसरात अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. आता या प्रकरणी पाच जणांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश रतनसिंग परदेशी (वय ४०), रोहित सुपरसिंग परदेशी (वय २५), रोहन सुपरसिंग परदेशी (वय २५), महेशसिंग ऊर्फ लखन जतनसिंग परदेशी (वय ३३) आणि सूरज सुपरसिंग परदेशी (वय २७, सर्व रा. केनेडी रस्ता, बंडगार्डन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महापालिकेचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत कोळेकर यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ढोले पाटील रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अतिक्रमण विभागाचे पथक कारवाई करण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपींनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला चढवला. लोखंडी झाऱ्याने पथकातील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती. त्यांच्याविरुद्ध मारहाणीचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने पाच जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या घटनेचा व्हीडीओदेखील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये अधिकारी व पोलिसांना अशाप्रकारे बेदम मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नेटकऱ्यांनीदेखील केली होती.