फौजफाटा मोठा पण कारवाई छोटी
दिलीप कुऱ्हाडे
येरवडा,(Yerawada)नगर रस्ता आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे डझनहून अधिक अधिकारी, पोलीस आणि चाळीसहून अधिक कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा सोबत घेऊन केलेली संयुक्त अतिक्रमणविरोधी कारवाई (Encroachment Action) केवळ देखावाच ठरली आहे. महापालिकेचा(PMC) अतिक्रमण विभाग ,गलिच्छ वस्ती निर्मूलन आणि आकाश चिन्ह विभागाने मिळून केलेल्या कारवाईत केवळ पाच हातगाड्या आणि काही दुकानांचे समोरचे पत्र्याचे शेड तोडले असून परिसराती अतिक्रमणे तशीच आहेत.
संपूर्ण येरवडा परिसराला पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमणाने व्यापले असतानाही पालिकेने केवळ कारवाईचा दिखावा केला.शेकडो हातगाडी आणि भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमणे करूनही एकही विक्रेत्यांवर कारवाई केली नाही. येरवडा पर्णकुटी चौक ते गुंजन चौक, गाडीतळ ते अशोक नगर आणि लक्ष्मीनगर परिसरात शेकडो भाजी विक्रेते आणि हातगाड्या विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने मांडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे येरवड्यातील अंतर्गक रस्ते अरुंद झाले आहेत. वाहने सोडा पण पादचा-यांना रस्त्यावरून ये-जा करता येत नाही. वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडत आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत असून परिस्थितीत हाताबाहेर गेली आहे. येरवड्यात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर प्रचंड अतिक्रमणे होऊनही पालिकेकडून वर्षानुवर्ष कारवाई केली जात नसल्याने विक्रेत्यांचे फावले आहे.यामध्ये दुकानदारांनी रस्त्यावर ओटे करून रस्ते अडवले आहेत. अनेक नागरिकांचे पालिकेकडे तक्रारी आल्यावर महापालिकेने मंगळवारी (दि. १०) येरवड्यात संयुक्त अतिक्रमण कारवाईचे नियोजन केले. गाडीतळ चौकात काही दुकान समोर उभारलेले पत्र्याचे शेड तोडण्यात आले.त्यानतंर चित्रा चौक आणि लक्ष्मीनगरपर्यंत पथकाने केवळ वाहनाने प्रवास केला. विक्रेत्यांनी स्वतःहून उभारलेले शेड काढले. मात्र एकही हातगाडी किंवा भाजी विक्रेत्यांवर पालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केली नाही. त्यामुळे पालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई झाल्यावरही
येरवडा परिसरातील रस्त्यावर 'जैसे थे' राहिली आहे. आकाश चिन्ह विभागाने काही छोटे ,मोठे फ्लेक्स बोर्ड काढण्याची कारवाई केली.पण चौकाचौकात उभारलेले मोठमोठे शुभेच्छांचे फ्लेक्स कायम होते.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक धनंजय नेवासे,सहायक निरीक्षक तेजस दाभाडे,वामन शिद्रक,नगर रस्ता कार्यालयाचे निरीक्षक भीमाजी शिंदे,कुणाल मुंडे,अविनाश चव्हाण,ढोले पाटील कार्यालयाचे रवि जाधव होते.आकाश चिन्ह आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन विभागाचे अधिकारी दिमतीला होते.तीन क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचा आणि पोलिसांचा फौजफाटा असूनही पथकाने कारवाईचा केवळ देखावा केला.
एवढा फौजफाटा नावालाच !
अतिक्रमण विभाग ,गलिच्छ वस्ती निर्मूलन आणि आकाश चिन्ह विभागाकडून संयुक्त कारवाई सुरू असली तरी एकमेकांमध्ये कुठलाही समन्वय दिसून आला नाही. एकाही भाजी विक्रेत्यावर,फ्लेक्स वर किंवा रस्त्यावर अडथळा ठरणारे पत्र्याचा घरांवर कारवाई केली नाही.कारवाईसाठी तीन क्षेत्रीय कार्यालयाचे तेरा अधिकारी,चाळीस कर्मचारी,दहा पोलीस,एक जेसीबी आणि सात ट्रक कारवाईच्या पथकात होते.
अतिक्रमण पथकाने येरवडा गाडीतळ ते लक्ष्मीनगर पर्यंत सहा हातगाड्या उचलले.फ्लेक्स आणि काही पत्र्याच्या शेड वर कारवाई केली.मंडई विभाग सोबत नसल्याने हातगाडी आणि भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली नाही.पालिकेकडून पुन्हा नियोजन करून सरसकट सर्वांवर तीव्र अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल.
-धनंजय नेवसे,
अतिक्रमण निरीक्षक, येरवडा क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.