पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आणखी एक दरड कोसळली, वाहतुकीचा खोळंबा
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ रात्री १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास दरड कोसळली होती. यामुळे मुंबईला येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. मात्र, आता मुंबईकडे जाणाऱ्या लेन सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वाहतूक सुरळीत होत नाही तोच लोणावळा लगत आणखी एक दरड कोसळली. सकाळी सहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. मात्र, आडोशी बोगद्याच्या तुलनेत ही दरड खूपच कमी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मौजे आडोशी गावच्या हद्दीत (km. No.41/00) जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर पडला होता. यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती. सदरचा मातीचा लगदा हा आयआरबीच्या जेसीपी, डंपरच्या साहाय्याने काढून टाकण्यात आला आहे. साधारणतः २० ते २५ डंपर लगदा रोडमध्ये पडलेला होता. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी उपस्थित दाखल झाला होता. त्यांच्याकडून लगदा काढण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.
दरम्यान, लोणावळा लगत आणखी एक दरड कोसळली आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे. मात्र, आडोशी बोगद्याच्या तुलनेत ही दरड खूपच कमी होती. आता लोणावळा लगतच्या मार्गावरील दरड हटविल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. या दरडीमुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. ही वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे. असे यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.