विद्यार्थी संतापले, फूड मॉलला ठोकले टाळे!
यशपाल सोनकांबळे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)आवारातील फूड मॉलमध्ये (Food Mall) गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना (Student) २० रुपये किमतीची बाटली विकत घ्यावी लागते. त्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी विरोध करत फूड मॉलला टाळे ठोकले. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, मात्र विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे समस्या आली आहे. आवश्यक सुविधांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन विद्यापीठाच्या इस्टेट विभागाने दिेले आहे.
पीएचडीचे विद्यार्थी आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीचे समन्वयक राहुल ससाणे (Rahul Sasane) म्हणाले की, कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या फूड मॉलमध्ये पिण्याचे पाणी नाही ही शोकांतिका आहे. विद्यापीठातील सर्व मेसमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आवाज उठवला. आता पिण्यासाठी पाणी नसल्याने आम्ही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन फूड मॉलमधील सर्व दुकाने बंद केली आहेत. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची आमची मागणी आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे दयानंद शिंदे म्हणाले की, अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन फूड मॉल बंद पाडला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती आम्ही विद्यापीठ प्रशासनाला करत आहोत अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ओंकार बेनके म्हणाले की, विद्यापीठातील वेगवेगळ्या मेसमध्ये जेवणाच्या ताटात झुरळे निघण्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली जात नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. याचा आम्ही निषेध करतो.
विद्यापीठाच्या आवारात नळजोड आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे अडचण निर्माण झाली होती. फूड मॉलमध्ये वापरण्या योग्य पाणी आहे. आजपर्यंत या समस्येबद्दल विद्यार्थ्यांकडून किंवा कोणाकडूनही तक्रार आलेली नव्हती. ही समस्या लवकरच सोडवली जाईल.
-ज्ञानेश्वर साळुंखे, हाऊस मॅनेजर, इस्टेट विभाग, पुणे विद्यापीठ
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.