आकाशातून पडलेली वस्तू तर हवामान खात्याचे उपकरण
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
ऐतिहासिक वारसा असलेल्या खेड तालुक्यातील वाफगाव या गावातील शेतात आकाशातून पडलेली अज्ञात संशयास्पद वस्तू हवामान खात्याने सोडलेले एक उपकरण असल्याचे आता उघडकीस आले आहे. बुधवारी कोरियन भाषेत मजकूर असल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी ही वस्तू ताब्यात घेतल्याने याबाबतचा खुलासा झाला आहे.
वाफगाव येथे पूर्वेकडे तळ्याचे माळ आहे. या माळाजवळील शेतात शेतकरी शंकर भालेकर हे बुधवार ३१ मे रोजी सकाळी फेरफटका मारत असताना त्यांना ही अज्ञात वस्तू आकाशातून शेतात पडताना दिसली. तसेच त्यातून पॅराशूट बाहेर पडलेले दिसले. ही वस्तू पडत असताना वस्तूला असलेला फुगा फुटल्यामुळे मोठा आवाज झाला होता. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
याप्रकरानंतर एका शेतमजुराने मालकाला फोन करून हकीकत सगितल्यावर त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले होते. तसेच माजी उपसरपंच अजय भागवत व पोलीस पाटील माऊली कराळे यांना कळवले. त्यांनी या घटनेची कल्पना संबंधित विभाग व खेडचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सकाळी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली व हे उपकरण ताब्यात घेतले. या उपकरणावर कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला. त्यामुळे सुरुवातीला हे उपकरण कोरियन असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला.
तसेच उपकरणावर वेदर लिहिले गेले असल्याने हे उपकरण हवेचा दाब, उष्णता, हवेतील आद्रता, हवेची दिशा व पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला होता. वस्तू आढळून आल्यानंतर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
उंचीवरील हवेचा आवाज मोजण्याचं हे यंत्र आहे. तापमान, आर्द्रता, दाब मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर करतात. समुद्रसपाटीपासून ३५ किमी अंतरावर ही मोजणी करतात. उंचीवरची हवा तापमान आणि तापमानात होणारे बदल तपासण्यासाठी उपयोगी ठरते. जगभरात दिवसातून दोनदा त्याची तपासणी केली जाते. सुमारे १७०० जागांवर ही तपासणी केली जाते.
राजस्थान येथे मार्च २०२३ अशाच प्रकारे वस्तू सापडली होती. तेव्हा शेजारील देशातून ही वस्तू पाठवली गेली असल्याची वावडी उठली होती. देशभर या घटनेची चर्चा होत असतानाच ही वस्तू संशयास्पद नसल्याचे उघडकीस आले आहे.
पुणे येथील हवामान विभागाचे हे उपकरण असून, बुधवारी पहाटे ते हवामान मोजण्यासाठी सोडण्यात आले होते. काही कालावधी नंतर ते जमिनीवर येते. त्यामुळे ही वस्तू संशयास्पद नसल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- राजकुमार केंद्रे,
पोलीस निरीक्षक खेड पोलीस
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.