पुणे महापालिका
पुणे महानगरपालिकेकडून प्रायोगिक तत्वावर २५ तृतीयपंथी व्यक्तींची भरती करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी २५ तृतीयपंथी व्यक्तींना तातडीने ठेकेदारामार्फत कामावर रुजू करून घेण्यास मान्यता दिली आहे. तर उर्वरित व्यक्तींना टप्याटप्याने कामावर घेण्यास मान्यता दिली आहे.
तृतीयपंथीना कामावर घेण्याच्या पाठीमागे एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गांना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी, तसेच तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेचा तृतीयपंथीयांना कामावर घेण्याचा हा पहिलाचा निर्णय आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेने या अगोदर असा निर्णय घेऊन तृतीयपंथीयांना संधी दिली आहे.
पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, मनपा भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मुलन व अतिक्रमण विभागाच्या कारवाई करिता सदरच्या तृतीयपंथी व्यक्तींना नेमणूक दिली जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सैनिक सेक्युरिटी प्रा. लि. व इगल सेक्युरिटी प्रा. लि. या खाजगी कंपनीकडून वेतन तसेच सरकारी देय देणे दिली जाणार आहेत.
सदर कामाचा प्रस्ताव सुरक्षा विभागाचे उप आयुक्त माधव जगताप यांनी तयार करून सादर केला होता. तसेच यासाठी शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करण्याऱ्या सेवाभावी संस्थांचे कमिटी तयार करून मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार याच्यांत सलोख्याचे व सामाजिक स्नेह राहावे यासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. भविष्यात तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही सुरु करण्यात असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.