अजित पवारांनी केली मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मॉडल हबची पाहणी
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी पुणे मेट्रोच्या (Pune Metro)स्वारगेट मल्टी मॉडल हबची पाहणी केली. तसेच सिव्हिल कोर्ट येथील इंटरचेंज स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक असा मेट्रोने प्रवास केला. (Swargate)
पुणे मेट्रोचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गीकेतील पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला आहे. तसेच वनाझ मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेतील वनाझ मेट्रो स्थानक ते रुबी हॉल क्लीनिक मेट्रो स्थानक हा मार्ग प्रवासासाठी खुल्या करण्यात आला आहे. उर्वरित मार्ग रुबी हॉल क्लीनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक आणि सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गावर अत्यंत वेगाने काम सुरू असून लवकरच हा मार्ग प्रवासी सेवेसाठी खुला करण्यात येणार आहे.
नुकतेच रुबी हॉल क्लीनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली आणि हा मार्ग डिसेंबरमध्ये कामे पूर्ण होऊन प्रवासी सेवेसाठी खुला होऊ शकेल. तसेच सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक हा भूमिगत मार्ग एप्रिलमध्ये प्रवासी सेवेसाठी खुला होऊ शकेल.
पुणे मेट्रोच्या उर्वरित कामाचा आढावा घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी ९.३० वाजता स्वारगेट मल्टी मोडल हब येथील भूमिगत स्थानक व मल्टी मॉडेल हब यांच्या कामाचा आढावा घेतला. ग्रॅनाईट बसवणे, वातानुकूलन यंत्रणा, फॉल सिलिंग, विद्युत, अग्निशमन, ट्रॅक्शन, युटिलिटी रूम्स, लिफ्ट एस्किलेटर ही कामे वेगाने सुरू आहेत. सदर कामांचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला व कामाच्या वेगाबद्दल व दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांनी स्वारगेट मल्टी मोडल हब येथील पार्किंग, एमएसआरटीसी बस स्थानकाकडे जाणारा पादचारी भूमिगत मार्ग व व्यापारी तत्त्वावर सुरू होत असलेल्या बांधकामाबद्दल माहिती दिली. हर्डीकर यांनी स्वारगेट मल्टी मॉडेल येथील एकूण नियोजित जागेच्या वापरासंबंधी आराखडा पालकमंत्री अजित पवार यांना समजावून सांगितला. पालकमंत्र्यांनी या जागेवर होत असलेल्या बांधकाम सुविधांचा आवाका, पुढील काही काळात या जागेचा होणारा कायापालट याविषयी समाधान व्यक्त केले.
पालकमंत्र्यांनी तदनंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाला भेट दिली. सिव्हिल कोर्ट येथील भूमिगत स्थानक ३३.१ मीटर खोल असून भारतातील खोल स्थानकापैकी एक आहे. तदनंतर पालकमंत्र्यांनी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक असा मेट्रोतून प्रवास केला. शिवाजीनगर मेट्रोस्थानकाची विशिष्ट रचना ज्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, किल्ले आणि वास्तू यांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. तसेच शिवाजीनगर मेट्रो स्थानकात निवडक किल्ल्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. सिव्हिल कोर्ट आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानकांच्या स्वच्छतेविषयी पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व अशा प्रकारे भविष्यात स्वच्छता राखावी अशा सूचना महामेट्रोला केल्या.
यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्ह्यचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकार ढाकणे, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ (कार्य), महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे (प्रशासन व जनसंपर्क), महामेट्रोचे कार्यकारी संचालक राजेश द्विवेदी आणि पोलीस उपायुक्त संदीप गिल हे अधिकारी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.