विद्यापीठाच्या भोजन गृहातील जेवणात अळीनंतर आता झुरळाची मेजवाणी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक आठच्या भोजनगृहातील जेवणात अळी निघाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मुलींच्या वसतीगृहातील मेसच्या जेवणात झुरळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकारानंतर वसतीगृहातील मेसमधील देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जावरून पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
विद्यापीठातील भोजनगृहातील जेवणाच्या दर्जाबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासन जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठातील विद्यार्थी अनेकदा दर्जेदार जेवणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मेस चालकाची हकलपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी याप्रकारानंतर समोर आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहामध्ये मुलींच्या जेवणासाठी स्वतंत्र मेसची सुविधी आहे. या मेसमध्ये साधारण सकाळी ६० ते ७० विद्यार्थीनी जेवणासाठी येतात तर संध्याकाळी १२५ ते १५० विद्यार्थीनी जेवणासाठी येत असतात. शिवाय सकाळच्या नास्ता याच मेसमध्ये दिला जातो. दरम्यान मुलींच्या या मेसमध्ये देण्यात आलेल्या पोह्यांमध्ये एक झुरळ आढळून आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सातत्याने विद्यापीठांमधील मेस चालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
मंगळवारी मेसच्या पोह्यांमध्ये झुरळ निघालं मागे एकदा रोलमध्ये केस निघाले. हे असं नेहमीच होतं मुली बोलायला घाबरतात, त्यामुळे अशा घटना सातत्याने घडत आहेत. मेसमधील रोजच्या जेवणाचा दर्जा सुद्धा खाण्यायोग्य नाही. बऱ्याच मुलींनी या जेवणाला कंटाळून बाहेरचे डबे मागवतात. मात्र प्रत्येक विद्यार्थीनीला बाहेरील डबे परवडत नाहीत. विद्यार्थ्यांना चांगले जेवण न मिळणे ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे मेसचे कंत्राटी बदलले गेले पाहिजे. मेसच्या जेवणावर नियंत्रण राहावे यासाठी एक विद्यार्थी समिती तयार करण्यात यावी याशिवाय विद्यार्थीनींना मेसची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी जणेकरून चांगले जेवण मिळेल. अशी माहिती विद्यापीठातील विद्यार्थीनीने नाव न सांगण्याच्या अटीवरून सीविक मिररला दिली आहे.
मी नाश्त्यासाठी पोहे घेतले. खाताना पोह्यामध्ये मोठे झुरळ दिसले. त्यानंतर मला उलटी आल्यासारखे झाले. तत्काळ हा प्रकार मेस चालकांच्या लक्षात आणून दिला. मेस चालकाने कोणतीही दिलगीरी अथवा असे का घडले याचे स्पष्टीकरण दिले नाही. यावरुन त्यांनी मुलांची किती काळजी आहे, हे दिसून येते.
- विद्यार्थिनी
झुरळाचा मेस चालकाला पडला प्रश्न
मंगळवारी सकाळी मुलींच्या मेसमध्ये झुरळ मिळाले. मात्र हे झुरळ आले कुठून हा प्रश्न मला पडला आहे. मिळालेल्या झुरळाचा आकार मोठा आहे. शिवाय झुरळ आहे तसेच आहे. जर पोह्यामध्ये झुरळ असते तर ते पाढंऱ्याशुभ्र पोह्यांमध्ये दिसून आले असते. तसेच पोहे परताना दिसून आले असते. त्यामुळे चार लोकांच्या डोळ्यासमोरून झुरळ गेले कसे.
-अतुल लोणारे, मेस चालक
मुलींच्या वसतिगृहामधील मेसमध्ये झुरळ आढळून आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सातत्याने विद्यापीठांमधील मेस चालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. या मुजोर मेस चालकांवर विद्यापीठ प्रशासनाचे कसल्याही पद्धतीचे नियंत्रण राहिलेले नाही. जर या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असती अथवा एखाद्याच्या जीवाला काही झाले तर त्यास सर्वस्वी मेसचालक व विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार आहे. आम्ही विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्यावतीने भोजनगृह समितीची मागणी करत आहोत. परंतु अजूनपर्यंत ही समिती गठीत केलेली नाही. विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ या मेसचालकावरती कठोर कारवाई करावी व त्याचे टेंडर रद्द करून नवीन चालकास मेस चालवण्यासाठी द्यावे. अन्यथा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटना तसेच विद्यापीठातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत .
-राहुल ससाणे (विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती)
मुलींच्या वसतीगृहातील मेसमध्ये देण्यात आलेल्या पोह्यांमध्ये आज झुरळ आढळून आल्याची माहिती घेतली. त्यानंतर मेस चालकांशी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे चुकून झाले असल्याचे सांगितले. यानंतर जेवण बनवताना आम्ही काळजी घेऊ, अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिली आहे. वसतिगृह प्रमुख म्हणून नेहमीच मुलांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा तपासत असते.
- प्रविण तलत (वसतीगृह प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
मुलींच्या वसतिगृहात या आहेत समस्या...
- पिण्यासाठी शुद्ध पाणी आपुरे, अनियमीत पाणीपुरवठा
- वसतिगृह क्रमांक आठ मधील खोल्यांमध्ये बुरशी
-वायफाय आणि नेटवर्कची समस्या
-वसतिगृह परिसरात भटक्या प्राण्यांचा वावर
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.