नोटिशीनंतर आता मेट्रोला गुन्हा दाखल करण्याची तंबी
रोहित आठवले
वाहनचालकांना त्रास न होता काम सुरू ठेवण्याबाबत वेळोवेळी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाने नुकतीच मेट्रोला नोटीस बजावत काम का थांबविण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती. त्यानंतर आता, नियमांची पायमल्ली होत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याची तंबी हिंजवडी वाहतूक विभागाने मेट्रोला दिली आहे.
गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पहाटे साडेपाच वाजता वाहतूक वळविण्यात येऊ नये, अशी पूर्व कल्पना देऊनही मेट्रोकडून पोलिसांच्या सूचनेला केराची टोपली दाखविली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची तंबी मेट्रोला देण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे तीन टप्पे आहेत. त्यापैकी हिंजवडी-शिवाजीनगर हा तिसरा टप्पा असून, पिंपरी ते शिवाजीनगर (स्वारगेट) आणि वनाज ते रुबी हॉल (रामवाडी) या दोन टप्प्यांचे काम महामेट्रोकडून केले जात आहे, तर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम अन्य कंपनीकडून होत असून, याबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांच्या अनेक तक्रारी शासन दरबारी जात आहेत.
वायू-ध्वनिप्रदूषणाबाबत ताथवडे येथील नागरिकांनी एनजीटी (हरित लवाद) मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांकडे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे उघड झाले आहे.
२४/७ मेट्रोचे काम सुरू असते. त्यामध्ये रात्रीपासून पहाटे साडेपाचपर्यंत हिंजवडी आयटीपार्कच्या आसपासच्या परिसरातील रस्ते बंद करून काम करण्यास पोलिसांनी मेट्रोला परवानगी दिली आहे. यामध्ये अवजड वाहतूक, व्हाया डक्ट घेऊन येणे आणि मोठ्या क्रेनमधून त्याचे फिटिंग आदी कामे केली जातात. याप्रकारची कामे सुरू असताना अन्य वाहनांच्या सुरक्षेसाठी वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असते.
वाहतूक कोठून कुठे वळविण्यात यावी. त्याचा कालावधी किती असावा याबाबत वाहतूक पोलिसांकडून सातत्याने लेखी स्वरूपात मेट्रोला सूचना केल्या जातात. परंतु, मेट्रोच्या ठेकेदारांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभारावर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कोणताच अंकुश राहिलेला दिसत नाही. त्यामुळे सातत्याने आयटीयन्ससह सामान्य वाहनचालकांना मेट्रोच्या आडमुठ्या धोरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. पहाटे साडेपाच नंतरही बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आल्याने विरुद्ध दिशेने येणारे एखादे वाहन बंद पडल्यास लांबपर्यंत रांगा लागत आहेत.
एखादे काम पूर्ण झाल्यानंतरही तेथील बॅरिकेड्स न हटविणे. रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे झालेले खड्डे वेळेत न बुजविणे, अवजड वाहने वेळेत पुन्हा कारशेडमध्ये न नेणे अशा प्रकारच्या कामामुळे हिंजवडी आयटीपार्क अंतर्गत भागात वाहतूक कोंडीची समस्या कामय आहे. हिंजवडीचा परिसर महापालिकेअंतर्गत नसल्याने येथे विविध शासकीय विभागांमार्फत काम चालते. त्यामुळे यांचे एकत्रीकरण आवश्यक होते. त्यामुळे दोनच महिन्यांपूर्वी हिंजवडी वाहतूक विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेले सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी सर्व विभागांची बैठक घेतली होती.
हिंजवडी आयटी असोसिएशन, मेट्रो, एमआयडीसी, पीएमआरडी, वनविभाग, पोलीस आदी विभागांना बोलावून प्रत्येकाच्या अखत्यारित असलेल्या कामकाजाचा आणि समस्या-सूचनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही वेळोवेळी मेट्रोला अनेक सूचना केल्यानंतरही परिस्थितीत बदल नसल्याचे चित्र सध्या हिंजवडी भागात पाहायला मिळत आहे.
गुरुवारी राज्यातील एक बडा नेता हिंजवडी भागातून सकाळी पाच ते सहा या कालावधीत प्रवास करणार होते. त्यामुळे मेट्रोने साडेपाचपूर्वी सर्व बॅरिकेड्स काढून घ्यावेत. व्हीआयपी दौऱ्यामुळे सामान्य नागरिकांना आणि नाईट शिफ्टवरून घरी परतणाऱ्या आयटीयन्सना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी मेट्रोला पूर्वकल्पना दिली होती.
हिंजवडीमधील बापूजी बुवा चौक, फेज ३ टी-जंक्शन, माणदेवी चौक, गोदरेज टी जंक्शन, पांडवनगर चौक, फेज १ सर्कल, जोमॅट्रिक सर्कल, टाटा टी जंक्शन, लक्ष्मी चौक, विनोदे कॉर्नर आणि भूमकर चौक आदी ठिकाणी कोठेच वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी करूनही, मेट्रोकडून या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे व्हीआयटी मार्ग आणि अन्य वाहनांना एकाच मार्गाने जावे लागल्याने सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे हिंजवडी वाहतूक पोलिसांनी आता मेट्रोला गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे.
मेट्रोसह या भागातील सर्व संबंधितांना एकत्रित बोलावून समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वेळोवेळी मेट्रोला सूचना करूनही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांना काम का थांबविण्यात येऊ नये अशी विचारणा नोटीस देऊन केली होती. त्यानंतर आता सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने वेळप्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
– मच्छिंद्र आदलिंग, सहायक पोलीस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.