पुणे: इंदिरानगर झोपडपट्टीच्या जागेवर उभ्या राहणार टोलेजंग इमारती

पुणे महापालिकेच्या जागेवरील गुलटेकडी येथील इंदिरानगर येथील मीनाताई ठाकरे वसाहत या झोपडपट्टीचे ‘एसआरए’अंतर्गत त्याच जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 14 Sep 2024
  • 05:41 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एसआरएअंतर्गत पालिकेच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसनाचा राज्यातील पहिलाच प्रकल्प

पुणे महापालिकेच्या जागेवरील गुलटेकडी येथील इंदिरानगर येथील मीनाताई ठाकरे वसाहत या झोपडपट्टीचे ‘एसआरए’अंतर्गत त्याच जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत.

या जागेवर उभारण्यात येणारा झोपडपट्टी पुनर्वसनाचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.  या ठिकाणी तब्बल अडीच हजारांहून झोपड्या असून त्यांचे सर्वेक्षण सुरू झाले असून लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.

राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवरील झोपडपट्ट्यांचे एसआरए अंतर्गत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात प्रथमच एसआरए पुणे महापालिकेसोबत योजना राबवत आहे. या ठिकाणी ४५ मीटरचे टॉवर उभे राहणार आहेत.

दरम्यान, या ठिकाणी एसआरएअंतर्गत पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे महापालिकेने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन या भागातील प्राथमिक सर्वेक्षणदेखील केले आहे. गुलटेकडी येथील नेहरू रस्ता आणि महर्षिनगरच्या मध्ये तब्बल १२ एकर जागेवर मीनाताई ठाकरे इंदिरानगर ही मोठी वसाहत आहे. त्यामध्ये २,५५४ झोपड्या आढळून आल्या आहेत. जागेची मोजणी, डिमार्केशन आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्वेक्षण सुरू केले आहे. यापूर्वी एसआरए योजनेसाठी विकसक सर्वेक्षण करायचे. परंतु यंदा प्रथमच महापालिका प्रशासनाने हे सर्वेक्षण सुरू केले आहे.

४५ मीटर उंचीच्या १२ ते १३ इमारती
झोपडपट्टीच्या जागेवर टीपी आणि महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्ते, उद्यान आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरक्षण आहे. या प्रकल्पामुळे या आरक्षणांची जागा मोकळी होणार असून पर्यायी रस्ते उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक सर्वेक्षणात साधारण अडीच हजार झोपड्या आढळल्या असल्या तरी काही दुमजलीदेखील आहेत. अशा दुमजली झोपड्यांचे २००० पूर्वीचे पुरावे ग्राह्य धरून त्यांची स्वतंत्र नोंदणी करावी लागणार असल्याने संख्या वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ४५ मीटर उंचीच्या १७-१८ मजली साधारण १२ ते १३ इमारती उभ्या राहतील. निविदेतील अटींनुसार अधिकाअधिक घरे देणार्‍या आणि निविदांच्या अटी-शर्तींनुसार महापालिकेला मोबदला देणार्‍या विकसकाला हे काम देण्यात येईल. या बदल्यात विकसकाला टीडीआर, एफएसआय आणि त्याच्या प्रकल्पाच्या विकसनाला जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे या प्रकल्पासाठी नेमलेले विशेष अधिकारी सुधीर कदम यांनी सांगितले.  

नागरिकांकडून कागदपत्रे गोळा करणार
महापालिकेकडील ४५ आणि बिबवेवाडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडील कर्मचार्‍यांची मदत घेतली जाणार असून १९ सप्टेंबरपासून येथील नागरिकांकडून कागदोपत्री पुरावे गोळा केले जाणार आहेत. या झोपडपट्टीतच पाच ठिकाणी नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याची आणि पुरावे गोळा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून उपायुक्त चेतना केरूरे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या कामासाठीची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर या प्रकल्पाला आणखी गती मिळेल, असा विश्वास या प्रकल्पासाठी नेमलेले विशेष अधिकारी सुधीर कदम यांनी व्यक्त केला.

Share this story

Latest