झाडाची फांदी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला सूचले शहाणपण
पुणे: शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यात याव्यात, अशी तक्रार महापालिकेकडे (PMC) करण्यात आली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे एका तरुणाला जीव गमावावा लागला आहे. या घटनेमुळे पुणेकरांनी महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या संतापानंतर महापालिकेला शहाणपण सूचले असून या झाड्याच्या फांद्या का काढण्यात नव्हत्या. याबाबतची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असून अहवालही सादर केला जाणार आहे. (Pune News)
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रविवारी ओंकारेश्वर मंदिराजवळील टपरीवर चहा पिताना या झाडाची फांदी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे पु्ण्यात चांगलेच वातावरण तापले आहे. महापालिकेला तक्राकर प्राप्त होऊन महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले याची चौकशी करण्याची मागणी पुणेकरांनी केली आहे. त्यानुसार या बाबतची पाहणी करण्यात येणार असून अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालात अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ चहाच्या टपर्या आहेत. कसबा पेठेत राहण्यास असलेला अभिजित गुंड नावाचा तरुण रविवारी सायंकाळी मित्रांसोबत टपरीवर चहा पिण्यासाठी गेला होता. त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने रविवारी सायंकाळी ओंकारेश्वर मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. अचानक झाडाची फांदी अभिजितच्या डोक्यावर पडली. गंभीर जखमी झालेल्या अभिजितला नागरिकांनी तातडीने रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मात्र, येथील धोकादायक झाडे काढण्यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरीदेखील येथील धोकादायक झाडे, फांद्यांवर कारवाई केली गेली नसल्याने अभिजित गुंड या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूला महापालिकाच जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुण्यातील २४१, शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ चहाच्या टपर्या आहेत. या परिसरात उंबराचे पूर्णपणे वाळलेले झाड आहे. हा परिसर रहदारीचा व लगत रस्ता आहे. चहाच्या टपर्यांमुळे नागरिक येथे उभे असतात. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असून, काही फांद्या त्वरित काढून घेण्यासंदर्भात गणेश पाचरकर नावाच्या व्यक्तीने ३० जुलै रोजी पीएमसी केअरला तक्रार केली होती. मात्र, यावर कार्यवाही न झाल्याचे समोर आले आहे.