पुरग्रस्तांसाठी ७० वर्षीय आजीबाईची तळमळ, साहित्य घेऊन पोहचली पुण्यात
देशभरासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. या पूरग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुण्यात “साडी चॅलेंज” नावाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होऊन एक हात मदतीचा देण्यासाठी ७० वर्षीय आजीबाई मुंबईवरून पुण्यात दाखल झाली आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ती प्रयत्न करीत आहे. तिने वापरात असलेल्या आणि नसलेल्या साड्या आणि इतर साहित्य दिले आहे. जेणेकरून पूरग्रस्तांना मदत होईल.
पुण्यातील वंदे मातरम् युवा पोलीस सोसायटी आणि युवा वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यामाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वी सुरू करण्यात आलेल्या “साडी चॅलेंज” उपक्रमात आतापर्यंत १५ हजार साड्या, १० हजार सतरंज्या, १० हजार चॅदरी (साड्या वापरण्यायोग्य जुन्या/नव्या) यांच्यासह इतर वस्तून संकलीत झाल्या आहेत. वंदेमातरम संघटना, डिझास्टर मॅनेजमेंट ॲंड रिसर्च फाऊंडेशन (डिमार्फ) ह्या संस्थांनी यवतमाळसाठी आपत्कालीन सेवा कार्य सुरु केले आहे. बाकी वस्तू संकलित करण्यास सुरुवात झाली आहे.
संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सचिन भारती शिवाजी जामगे म्हणाले की, “आज अक्षरशः वय वर्ष ७० असणाऱ्या आजी मुंबईवरून थेट गाडी करून पुण्यात आल्या असून यवतमाळमध्ये आलेल्या पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी साड्या, ब्लॅंकेट, चादर दिले. या वयात पण येऊन जाऊन चारशे किलोमीटरचा प्रवास करणे सोप्प नाही. तरीही राष्ट्रभावनेने आपण आपल्या समाजाचे देणे लागतो, ही भावना व हे राष्ट्रप्रेम घेऊन या आजी पुण्यात आल्या खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे. या अशा राष्ट्रप्रेमी बांधवांमुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा काम करण्याची ऊर्जा मिळते.”
पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यासाठी तुम्ही साडी चॅलेंजमध्ये पुढील प्रकारे सहभागी होऊ शकता.
१) आपल्या घरातील वापरण्यायोग्य नव्या जुन्या साड्या गणराज हॉटेल, बाजीराव रोड, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे आणून द्यायच्या आहेत. किंवा आपण आपल्या सोसायटी, वस्ती भागात साड्यांचे एकत्र संकलन केले तर त्या घेण्यासाठी वंदेमातरम संघटनेचे कार्यकर्ते येतील.
२) सोशल मिडीयावर आपण आपल्या किमान ३ बहिणी, मैत्रीणींना टॅग करुन हे साडी चॅलेंज करावे आणि त्यांना साड्या दान करण्याचे आवाहन करावे. आपल्या माताभगिनींसाठी कमीत कमी वेळात हजारो साड्या संकलित करायच्या असल्यामुळे हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मिडीया, व्हॉटसॲपच्या माध्यमातून पोहचवावा.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.