पुण्यात वर्षात तीन लाख वाहनांची भर
वाहतूक कोंडीच्या (Traffic congestion) चक्रव्युहात पुणे अडकलेले असताना गेल्या वर्षभरात सुमारे तीन लाख वाहनांची भर पडली आहे. यामध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक असले तरी मोटारींची संख्याही वाढतेय. त्यातही टुरिस्ट टॅक्सींची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ हजार वाहनांची वाढ झाली आहे. (Pune News)
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) (RTO) झालेल्या नोंदीनुसार यंदाच्या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुणे शहरात एकूण २ लाख ९० हजार वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ हजार वाहनांची वाढ झाली आहे. कोरोना आणि त्यानंतरच्या काळात वाहन खरेदीत घट झाली होती. गेल्या वर्षभरापासून वाहन खरेदीने वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे. २०२२ मध्ये २ लाख ५४ हजार वाहनांची खरेदी झाली होती. यावर्षी दुचाकी, मोटार कार, बस, ऑटो रिक्षा, मालवाहू मोटारी, टुरिस्ट टॅक्सी आदींच्या खरेदीत वाढ झाली आहे. रुग्णवाहिका, ट्रॅक्टर, ट्रेलर या क्षेत्रातील खरेदीचे प्रमाण घटले आहे.
‘ सीविक मिरर’शी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, यंदाच्या वर्षी सर्वाधिक वाहननोंदणी झाली आहे. नेहमीप्रमाणे दुचाकी खरेदीचा वेग कायम आहे. यंदा दुचाकी खरेदीत २० हजारांनी वाढ झाली आहे. चारचाकी वाहनांच्या खरेदीत साडेतीन हजारांनी वाढ झाली आहे. या वर्षी वाहन खरेदी पूर्वीपेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षांच्या खरेदीत वाढ झाली आहे. सध्या अनेक जण स्वयंरोजगार शोधत आहेत. त्यामुळे प्रवासी मोटारींचे प्रमाण वाढत आहे. खासगी नोकरी करण्यापेक्षा स्वत:चे वाहन घेऊन व्यवसाय करण्याकडे अनेक जणांचा ओढा वाढला आहे.
महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की, कॅबचालक आता स्वत:चे वाहन घेण्यास पसंती देत आहेत. काही पर्यटन व्यवसाय कंपन्या त्यांच्या पॅकेजमध्ये कॅबसेवा देखील देत आहेत. प्री-बुकिंग प्रणालीद्वारे कमाई वाढली आहे. बर्याच जणांनी प्रवासी वाहने भाड्याने देणे हा साइड बिझनेस म्हणून निवडला आहे.
देवम टूर्स अँड ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नीलेश भन्साळी म्हणाले की, बहुराष्ट्रीय कंपन्या वाढत असल्याने प्रवासी वाहनांचा व्यवसाय वाढला आहे. कोरोनांनतर धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळेही मोटारींची मागणी वाढली आहे.