संग्रहित छायाचित्र
पावसाळ्यामुळे पर्यटक फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. मात्र, अशातच दारु पिऊन गाडी चालवण्याचा घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी १४ जुलै ते १७ जुलै या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या गुन्ह्याखाली ३४० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, “आम्ही पुण्याच्या ग्रामीण भागात ३४० लोकांवर कडक कारवाई केली आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे प्रकरण न्यायालयात जाणार असून, न्यायालय योग्य शिक्षेचा निर्णय घेईल.
विशेषत: शनिवार व रविवारच्या दिवसात आम्ही गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियमितपणे मोहीम राबवत असतो. कृपया मद्यपान करून तुमची वाहने चालवू नका. कारण असे केल्याने तुम्ही केवळ तुमचा जीव धोक्यात घालत नाही. तर इतरांचा जीवही धोक्यात आणत आहात. जर तुम्ही पकडले गेले तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल. केवळ ग्रामीण भागातून गाडी चालवल्याने ते पकडले जाणार नाहीत, असा विचार लोकांनी करू नये. संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही दररोज गस्त घालत आहोत”, असेही अंकित गोयल यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.