उंड्रीमध्ये महापालिकेने काढले १५,७०० चौरस फुटांचे अतिक्रमण
अमोल अवचिते
महापालिकेकडून शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाई केली जात आहे. त्यानुसार उड़ी (ता. हवेली) येथील स. नं. ५१, ५६, ५७ आणि ५८ मधील अनधिकृत पत्रा शेडवर शुक्रवारी (दि. १३) महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन १ च्या वतीने कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने शुक्रवारी केलेल्या अतिक्रमणविरोधी लक्षवेधी कारवाईत सुमारे १५,७०० चौरस फूट अनधिकृत पत्रा शेड हटविण्यात आले. ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आणि कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत शाखा अभियंता भीमराव पवार आणि कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार यांच्या पथकाने दहा बिगारी, एक जेसीबी मशीनच्या साहाय्याने केली. शहरासह उपनगर भागांमध्ये रस्त्यांच्या आजूबाजूला चांगलेच अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या विरोधात नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत असल्याने महापालिकेकडून अतिक्रमण काढण्याच्या कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेच्या जागेवरदेखील अतिक्रमण होत असल्याचेही दिसून येत आहे. त्या अतिक्रमणावर देखील महापालिकेकडून हातोडा चालविला जात आहे.
शहरातील रूफ टॉप हॉटेल, तसेच अनधिकृत बांधकामांवरही पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. कारवाईनंतर पुन्हा शेड उभारली किंवा बांधकाम केले तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यापूर्वी कारवाई केल्यानंतर पुन्हा बेकायदा बांधकाम करणाऱ्या २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.
महापालिकेकडून वारंवार हॉटेल, पबचे टेरेसवरील आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण होत असल्याने हॉटेलमुळे होणारी वाहतूक कोंडी, रात्रीचे वाढलेले उपद्रव, पार्किंगला जागा न सोडता सर्रासपणे रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे नागरिकांकडून वारंवार कारवाई करण्याची मागणी केली जाते.
महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर शहरातील अतिक्रमणे, फ्रंट आणि साइड मार्जिनमधील बांधकाम, शेड यावर अतिक्रमण विभाग, बांधकाम विभागाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. अतिक्रमणांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.