संग्रहित छायाचित्र
भरधाव महागडी कार चालवत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण आणि तरुणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी कोझी आणि ब्लॅक पब येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. (pune hit and run case) जप्त करण्यात आलेले फुटेज व आरोपींकडून तपासादरम्यान देण्यात आलेली माहिती यामध्ये मोठी तफावत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. यावरून विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी पबचालकांना चांगलेच फटकारले. गरज पडल्यास मद्यधुंदांच्या राहण्याची व्यवस्था मालकांनी पबमध्ये करावी, असे त्यांनी सुनावले. (Kalyaninagar car accident case)
विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे म्हणाल्या, ‘‘पब चालवणे म्हणजे मजा नाही. मद्यपान करणारे ग्राहक सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची खात्री करणे ही पबमालकांची जबाबदारी आहे. मद्यधुंद व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी गेटच्या बाहेर एक व्यक्ती तैनात करायला हवी. मद्यधुंदांना गाडी चालवून देऊ नका. गरज पडल्यास त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच करा.’’
ब्लॅकमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचेही पोलीस तपासातून पुढे आले आहे. बेदरकारपणे कार चालविणाऱ्या मुलासह इतर अल्पवयीन मुलांना पबमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही पब मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना मंगळवारी (दि. २१) अटक करण्यात आली.
कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली.
‘ब्लॅक’ पबमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. पोलिसांकडे प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींनी त्यांच्या पबमध्ये अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांच्या वयाची खात्री करता मद्य पुरविल्याचे दिसते. तसेच हॉटेलमध्ये दर्शनी भागावर कोठेही बाल न्याय अधिनियम कलम ७७ प्रमाणे नोटीस किंवा सूचना लावलेली नसल्याने आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याचे सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अल्पवयीन मुलांना पबमध्ये दारू देणे हा अदखलपात्र गुन्हा आहे. तर मोटार वाहन कायद्यानुसार दाखल कलमांबाबतची कारवाई योग्य नाही. कारण आरोपी मोटारीचे मालक नाहीत. तसेच त्या अनुषंगाने त्यांचा गुन्ह्यात काहीच सहभाग नाही. त्यामुळे अटकेची कारवाई बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अॅड. जैन यांनी केला.
पबचे या बाबींकडे दुर्लक्ष
पबमध्ये प्रवेश देताना मुलांच्या वयाची विचारपूस केली नाही
सदस्य नसताना पबमध्ये प्रवेश दिला
अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जाणार नसल्याचा फलक लावला नाही
बार काऊंटरला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत
पुढील मुद्यांचा तपास होणार
दारू पिण्यासाठी आलेल्यांकडे परवान्याबाबत काय खात्री केली?
आरोपींनी अल्पवयीन मुलास कोणत्या पबच्या सदस्याच्या नावाने प्रवेश दिला?
अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्राला मद्य पुरविल्यानंतर दिलेले बिल व केलेल्या पेमेंटचा तपशील?
पबचे परवाने आणि त्यांच्या सभासदांची नावांची माहिती घेऊन तपासणी करणार?
अल्पवयीन मुलांना मद्य पिण्यास परवानगी देण्यात पबच्या मालकांचा सहभाग आहे का?
तिघांची २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांच्या वयाची खात्री न करता त्यांना मद्य पुरविण्यात आले. याबाबत त्याकडे विचारपूस करून ते रेकॉर्ड तपासासाठी जप्त करायचे आहे. अल्पवयीन मुलाला पबमध्ये मद्य पिण्याची मुभा व परवानगी देण्यामध्ये दोन्ही पबमालकांचा काय सहभाग आहे? हॉटेलचे प्रत्यक्ष व्यवस्थापन कोण पाहते?त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे का, याविषयी अटक आरोपींकडे सखोल तपास करायचा आहे. हॉटेलचे मुख्य मालक व इतर व्यवस्थापन पाहणारे व्यवस्थापक यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे का? यादृष्टीने तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड. विभूते व अॅड. कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत न्यायालयाने आरोपींना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे अॅड. एस. के. जैन आणि अॅड.अमोल डांगे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज अॅड.असीम सरोदे यांनी केला होता. तो अर्ज न्यायालयाने मान्य केला.