संग्रहित छायाचित्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागाच्या गलथान कारभारा विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) मंगळवारी (८ ऑक्टोबर) तीव्र स्वरूपाचे 'निद्रानाश' आंदोलन विद्यापीठाच्या परिसरात करण्यात आले.
जून महिन्यामध्ये बीए एलएलबी द्वितीय सत्राच्या परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षांचा निकाल जुलै महिन्यामध्ये जाहीर झाला होता. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मुल्यांकनाचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही. या विद्यार्थ्यांना तृतीय सत्राच्या परीक्षेचे अर्ज भरावयाचे आहेत. परंतु, द्वितीय सत्राच्या पुनर्मुल्यांकनाचा निकाल अद्यापही न लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचं अभाविपकडून सांगण्यात आलं.
तसेच विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत अचानक बदलल्याने विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा निकाल हा परीक्षा अर्ज भरण्याच्या मुदतीनंतर लागला तर त्यांचे अतिरिक्त भरले गेलेले शुल्क विद्यार्थ्यांना कधी परत मिळणार? असा सवाल अभाविपने केला आहे.
याबाबत विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना कधी स्पष्टता देणार? वरील सर्व प्रश्नांना/ समस्यांना विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तात्काळ विद्यार्थ्यांचा निकाल लावावा. अशा प्रकारच्या विविध मागण्या अभाविपने केलेल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी, 'परीक्षेचा निकाल पुढच्या परीक्षेची तारीख आल्यावर लागतो आणि पुढच्या परीक्षेमध्ये नक्की कोणते पेपर द्यायचे? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. हा सर्व गोंधळ फक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामुळे होत आहे. परीक्षा विभागाने आपले काम लवकरात लवकर पार पाडले तर विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. यासाठी अभाविप कायम विद्यार्थ्यांच्या बाजूने असून, विद्यार्थ्यांसाठी लढत राहील.' असे मत अभाविप पुणे महानगरमंत्री हर्षवर्धन हारपुडे यांनी व्यक्त केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.