'समाज कल्याण विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात अभाविपचे पोलखोल आंदोलन!'
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने समाज कल्याण विभागाकडून झालेल्या वसतिगृह संदर्भातील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.
समाज कल्याण विभाग हा विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असायला हवा. परंतु, समाज कल्याण विभागातील एका कर्मचाऱ्याने वसतिगृह उपलब्ध करून देण्याच्या आमिषाच्या नावाखाली गरजू विद्यार्थ्यांकडून लाच घेतली व पैसे न दिल्यास वसतिगृह मिळणार नाही अशी वारंवार धमकी दिली. हा भ्रष्टाचाराचा प्रकार गेले अनेक महिने सुरू असून या विषयाची समाज कल्याण विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. या भ्रष्टाचाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून गुरुवारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.
या वेळी सहायुक्तांच्या कक्षा बाहेर बराच वेळ आंदोलन करूनही समाज कल्याण प्रशासन आणि सहआयुक्तांकडून आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या कक्षाबाहेर निवेदन चिकटवण्यात आले. अभाविपने समाज कल्याणच्या प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदन देऊन; अशा प्रकारचा कोणताही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्यावी, गरजू विद्यार्थ्यांची वेळोवेळी सोय करून देण्यात यावी व भ्रष्ट कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी, "समाजकल्याण विभाग हा गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे. पण त्यांची जर आर्थिक पिळवणूक या भ्रष्टाचारी लोकांकडून होणार असेल तर समाज कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विद्यार्थी परिषद अजून मोठे आंदोलन करेल." असे मत पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी व्यक्त केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.