पालखी जाताच महापालिकेने जमा केला तब्बल ३०० टन कचरा
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा नुकताच पुण्यातून पंढरीकडे मार्गस्थ झाला आहे. पालखी सोहळा पुण्यातून जाताच पुणे महापालिकेने तब्बल ३०० टन कचरा जमा केला आहे. या संपूर्ण पालखी सोहळामध्ये वारकऱ्यांसाठी अनेक सामाजिक संघटना जेवण व नाश्त्याची व्यवस्था करतात. यातून निर्माण होणारा कचरा अनेकदा रस्त्यावर येतो. रस्त्यावर पडलेला कचरा जमा करण्यासाठी पुणे महापालिकेसमोर एक मोठे आव्हान होते.
पुण्यात तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या १२ आणि १३ जून रोजी मुक्कामी होत्या. यादरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा निर्माण झाला होता. मात्र, पालख्या पुण्यातून मार्गस्थ होताच महापालिकेने रस्ते साफ करण्याची मोहीम हाती घेतली. त्यानंतर यशस्वीरित्या रस्त्यावरील कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली.
याबाबत बोलताना पुणे महापालिकेच्या धनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत म्हणाल्या की, “संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालखी या पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये मुक्कामी असतात. या ठिकाणी सहाशे कर्मचारी पालखी सोहळ्याच्या स्वच्छतेसाठी तैनात होते. परंतु यंदा अतिरिक्त ६८ कर्मचाऱ्यांची फौज त्यांच्यासोबत दिल्याने कचरा उचलण्याचे काम अधिक सोपे झाले.”