संस्कृत विद्येच्या ज्येष्ठ अभ्यासकाने पुणे विद्यापीठाला दिला ९० वर्षापूर्वीचा अमुल्य ठेवा
बौद्धविद्येचे श्रेष्ठ अभ्यासक महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी नव्वद वर्षांपूर्वी तिबेटमधील वास्तव्यात एक दुर्मीळ संस्कृत ग्रंथ स्वतः लिहून काढला आणि ती प्रत भारतात आणली. संस्कृत विद्येचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्रीकान्त बहुलकर यांनी आपल्या संग्रहात असलेली ती प्रत तसेच इतर संशोधन सामग्री नुकत्याच झालेल्या एका अनौपचारिक समांरभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाकडे सुपूर्त केली असल्याची माहिती विभागप्रमुख प्रा. महेश देवकर यांनी दिली.
या समारंभास प्रा. श्रीकान्त बहुलकर, प्रा. देवकर, डॉ. लता देवकर, प्रा. प्रदीप गोखले, विभागातील अभ्यागत प्राध्यापिका व कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठाच्या प्रा. मधुमिता चट्टोपाध्याय, अमेरिकेतील फुल-ब्राईट नेहरू संशोधिका डॉ. लॉरेन बाउश व विभागातील अन्य प्राध्यापक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या ग्रंथासंबंधी माहिती देताना प्रा. देवकर म्हणाले, “पं. राहुल सांकृत्यायन यांनी १९३० च्या दशकात चार वेळा तिबेटची यात्रा करून तेथील बौद्ध विहारांमध्ये असलेल्या शेकडो बौद्ध ग्रंथांची छायाचित्रे काढली आणि तो संग्रह पाटण्याच्या बिहार रीसर्च सोसायटीला प्रदान केला. इसवी सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेलेल्या भावविवेक या बौद्ध पंडिताच्या मध्यमकहृदय या ग्रंथाचे एकमेव हस्तलिखित सांकृत्यायन यांना तेथे सापडले. त्या हस्तलिखिताची छायाचित्रे काढणे शक्य न झाल्याने सांकृत्यायन यांनी रात्रंदिवस बसून त्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत तयार केली.”
“भारतात परत आल्यावर त्यांनी ती प्रत पुण्यातील बौद्धविद्येचे आणि तिबेटी भाषेचे विद्वान प्रा. वा. वि. गोखले यांना दिली. प्रा. गोखले यांनीही राहुलजींच्या प्रतीची आणखी एक प्रत तयार केली. प्रा. गोखले यांनी त्या ग्रंथाचे संपादन आणि अनुवाद करण्याचे कार्य सुरू केले, तसेच जगातील अनेक विद्वानांना त्या ग्रंथाच्या संपादनात सहभागी करून घेतले. त्या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणाच्या संपादनाच्या कामात प्रा. श्रीकान्त बहुलकर सहभागी झाले. तो भाग १९८४ साली कोपनहेगन येथून प्रसिद्ध झाला. प्रा. गोखले यांनी ती हस्तलिखिते आणि संबंधित सामग्री प्रा. बहुलकर यांच्या स्वाधीन केली. गेली चाळीस वर्षे जतन करून ठेवलेला हा संग्रह प्रा. बहुलकर यांनी पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाकडे अभ्यासकांच्या उपयोगासाठी सुपूर्त केला आहे. विद्यापीठामध्ये पाली भवनाची योजना साकार होत असून त्यामधील नियोजित संग्रहालयामध्ये हा दुर्मिळ संग्रह ठेवण्यात येणार आहे”, अशी माहितीही प्रा. देवकर यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.