पुण्यातील नवविवाहितेचा महाबळेश्वरला सेल्फी काढताना दरीत कोसळून मृत्यू

महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुण्यातील अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) ही नवविवाहिता तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्युमुखी पडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 10 Oct 2023
  • 11:18 pm
Death

कात्रज : महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुण्यातील अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) ही नवविवाहिता तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्युमुखी(death) पडली. मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रेल्वेमध्ये लोको पायलट (चालक) असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर (वय ३०, रा. उंबरेगव्हाण, ता.जि. धाराशिव. सध्या रा. धनकवडी, पुणे) हे पर्यटक दाम्पत्य सोमवारी दोन दिवसांसाठी दुचाकीवरून महाबळेश्वर पर्यटनास आले होते. सोमवारी हे दांपत्य विविध प्रेक्षणीय स्थळांसह केट्स पाॅईंट पाहून गेले होते. आज सकाळी त्यांनी येथील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.

दुपारी जेवण करून पुणे येथे जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू केला होता. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर आले असता पतीकडे पत्नीने पुन्हा केट्स पॅाईंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पतीने मात्र पुण्याचा लांबचा प्रवास दुचाकीवरून करावयाचा आहे. खूप वेळ जाईल म्हणून केट्स पॅाईंट न पाहता जाऊ असे अंकितास सांगितले, परंतु तिने हट्ट धरल्याने पती सुनीलचा नाईलाज झाल्याने हे दांपत्य दुपारी साडेचार वाजता केट्स पाँईट येथे पोहचले.

केट्स पॉईंट पाहून ते निडल होल व परिसरातील धबधबा पाहण्यासाठी गेले. पाईंटवरील सुरक्षा कठड्यावर बसून त्यांनी फोटो व व्हिडीओ काढले असाच एक धबधब्याचा फोटो व व्हिडीओ घेताना अंकिता ही कठड्यावरून थेट तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात ती जागीच ठार झाली. पत्नी कोसळताच पतीने आरडाओरडा सुरू केला.

हा गोंधळ ऐकून स्थानिकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती स्थानिकांनी महाबळेश्वर व पाचगणी पोलीस ठाण्यासह वनविभाग, महाबळेश्वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्स यांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वनविभागाचे अधिकारी व जवानांनी अपघातस्थळी धाव घेतली.

पाचगणी पोलिस ठाण्याचे राजेश माने, महाबळेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक रौफ ईनामदार, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, महाबळेश्वर ट्रेर्कसचे सुनील बाबा भाटिया व सह्याद्री ट्रेर्कसचे संजय पार्टे यांच्यासह टीमने ५.३० वाजता मदतकार्यास सुरुवात केली. यावेळी ट्रेकर्सचे जवानांनी तीन पथके तयार केली. एक पथक मुख्य ठिकाणी दुसरे पथक रोपच्या सहाय्याने घटनास्थळावर पोहचले, तर तिसरे पथक केट्स पॅाईंटवरून डोंगर उतरुन घटनास्थळी पोहचले.

ट्रेकर्स पथकांमध्ये महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया, जयवंत बिरामणे, अनिल लांगी, सुनील केळगणे, महेश साळेकर आदींसह सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टे, विजय केळगणे, वनविभागाचे वनरक्षक सहदेव भिसे, वननरक्षक लहू राऊत, तानाजी केळगणे, वनस्थापन समितीचे सदस्य आदींनी महत्वाची भूमिका बजावली. दोनअडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून वर काढण्यात यश आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest