महापालिकेच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, नोटीस दिल्याने केला पाठलाग
महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून काम करणाऱ्या दिव्यांग अधिकाऱ्याने नोटीस दिली, या कारणावरून शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा ते सव्वा बाराच्या सुमारास शिवणे येथील एनडीए रस्त्यावरील श्री इंटरप्राईजेस महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण आणि दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ चे कलम ९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गणेश तुकाराम वांजळे रा. न्यू अहिरे गाव, शिवणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे असे नाव आहे. याप्रकरणी शाखा अभियंता दत्तात्रय निवृत्ती जगताप (वय ५४ गणेश कुंज, मोहन नगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश वांजळे याला जगताप यांनी अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिली होती. ही नोटीस घेतल्यानंतर वांजळे याने जगताप यांचा गणपती माथा ते देशमुख वाडी असा पाठलाग केला. त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, जगताप हे अपंग असल्यामुळे त्यांना त्यांच्या अपंगत्वाबाबत हिणवण्यात आले. अनधिकृत बांधकामासंदर्भात देण्यात आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या नोटीस देखील त्याने फाडून फेकून दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.