श्वानाच्या पिल्लाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा
श्वानाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. चार महिन्यांच्या सायबेरियन हिस्की जातीच्या श्वानाला चप्पल आणि लाथेने मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
जुनेद शेख (रा. उंड्री) असे गुन्हा
दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याविरोधात कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मिनी पीटर स्टंप (वय ६५) तक्रारदार महिला प्राणिमित्र आहेत. त्या एका सामाजिक संस्थेसाठी काम करतात. त्यांना व्हॉट्सॲपवर एक व्हीडीओ आला होता. या व्हीडीओमध्ये जुनेद त्याच्या ताब्यातील एका काळ्या-पांढऱ्या रंगाच्या सायबेरियन हिस्की जातीच्या चार महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लाला चप्पल आणि लाथेने मारहाण करत होता.
त्याच्या अशा प्रकारच्या क्रूर वागणुकीमुळे श्वानाचे पिल्लू जखमी झाले आहे. त्यामुळे स्टंप यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.